आरे कॉलनीतील विसर्जनाचा प्रश्न सुटला

ओ. पी. उद्यानाजवळ कृत्रिम तलाव; सहा ठिकाणी वाहनांवर व्यवस्था
आरे कॉलनीतील विसर्जनाचा प्रश्न सुटला
ANI

मुंबई : गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी अखेर छोटा काश्मीर येथील ओ. पी. उद्यानाजवळ कृत्रिम तलाव बांधण्यास आरे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे गोरेगाव परिसरातील गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न सुटला आहे. आरे कॉलनी परिसरात वाहनांवर सहा कृत्रिम तलाव उपलब्ध करून भाविकांची विसर्जनाची सोय करून देण्यात येणार आहे.

आरे कॉलनी परिसर केंद्र सरकारने ५ डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानंतरही या परिसरातील छोटा काश्मीर तलाव, गणेश मंदिर तलाव व कमल तलाव या तीन तलावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात होते. प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) बनवलेल्या मूर्तींचे नैसर्गिक जलप्रवाहांत विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने २००८ मध्येच बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करत पर्यावरणस्नेही उत्सवाबाबत पावले उचलण्याचे निर्देश सर्व शहरांतील स्थानिक प्रशासनांना दिले आहेत.

पालिकेकडून तलावांचे बांधकाम सुरू

आरे कॉलनीतील तलावांतील विसर्जनास स्वयंसेवी संस्थांनी विरोध केल्यानंतर आरे प्रशासनाने विसर्जनास मनाई केली आहे. या विषयी नुकतेच उच्च न्यायालयातही आरे प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केल्याने काॅलनीतील तलावांमध्ये यंदा विसर्जन बंदी निश्चित झाली आहे. या विषयी सोमवारी पालिका मुख्यालयात आरे पर्यावरण संवेदनशील माॅनिटरिंग कमिटीच्या झालेल्या बैठकीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी आणि शर्तीवर छोटा काश्मीर जवळच्या ओ. पी. उद्यानाजवळ कृत्रिम तलाव उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय झाला. मात्र जागा मालक म्हणून आरे प्रशासनाची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी अखेर आरे प्रशासनाने पालिकेला दिली आहे. पालिकेने तलावांचे बांधकाम सुरू केले आहे. शनिवार रात्रीपर्यंत काम पूर्ण झाले तर या तलावात गौरी-गणपती विसर्जन होऊ शकेल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in