मुंबईकरांची समस्या जैसे थे !

२४ तास पाणी योजना कागदावर या समस्यांचा सामना नेहमीच मुंबईकरांना करावा लागतो.
मुंबईकरांची समस्या जैसे थे !

आपल्या प्रभागातील समस्यांचे निवारण होईल या आशेने मतदार राजा मोठ्या विश्वासाने लोकप्रतिनिधीची निवड करत मुंबई महापालिकेत पाठवतो. विजयाची माळ गळ्यात पडली की, काही दिवस लोकप्रतिनिधी मतदार राजाचे गुणगान गातो. मात्र जसे दिवस पुढे सरकतात तसा लोकप्रतिनिधींना मतदार राजाचा विसर पडल्याचे दिसून येते. सुरळीत पाणीपुरवठा, खड्डे मुक्त रस्ते, अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांचे पुनर्वसन, आगीच्या घटनांपासून मुंबईकरांचे संरक्षण या सुविधा उपलब्ध करणे राज्यकर्त्यांची जबाबदारी. सत्ता येते, जाते पण नेते मंडळी अर्थपूर्ण राजकारणातचं व्यस्त असतात. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांचा जीव टांगणीला, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, २४ तास पाणी योजना कागदावर या समस्यांचा सामना नेहमीच मुंबईकरांना करावा लागतो. त्यामुळे सत्तेत कोणी विराजमान झाले तरी मुंबईकरांच्या समस्या कायमचं राहतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

दरवर्षी पावसाळ्यात इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळणे, खड्ड्यांमुळे होणारे रस्ते अपघात, हक्काच्या पाण्यासाठी मोर्चा काढणे या गोष्टी करण्याची वेळ करदात्या मुंबईकरांच्या येते. कुर्ला पूर्व येथील नाईक नगर सोसायटीतील इमारत कोसळली आणि १९ जण दगावले. यावेळी स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर नॉट रिचेबल होते. मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी. मात्र कुडाळकर घटनेच्या दिवशी गोहाटीत राजकीय खेळात व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले. प्रशासकीय यंत्रणांना घटनास्थळी धाव घेतली. मुंबई महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आयुक्तांना चुकीचा ऑडिट रिपोर्ट देणाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला. स्थानिक पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली. मात्र हा प्रश्न सुटलेला नाही. भविष्यात अशा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या प्रभागात काय अधिकृत अनधिकृत हे पहाणे गरजेचे आहे. मात्र अर्थपूर्ण राजकारणामुळे लोकप्रतिनिधींची हाताची घडी अन् तोंडावर बोट असते, हेही तितकेच खरे.

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासकीय राज्य आहे. राज्यातील सत्ता समीकरण बदले आहे. शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवत मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. तर शिवसेनेकडून भावनिक मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा सत्तेचा वारसा कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सत्ता कोणाचीही येवो करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध होतील, ही सर्वसामान्यांची अपेक्षा. मात्र राजकीय वातावरण इतके तापले आहे की, मुंबईकर असुविधांच्या बोजाखाली दबला जात आहे. मात्र नेते मंडळींना मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्याचे वेध लागल्याचे दिसून येते. मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध देण्यात नेते मंडळींना रस नाही, हेच वारंवार सिद्ध होते.

सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून मुंबई महापालिकेकडे बघण्याचा दृष्टीकोन सगळ्याच राजकीय पक्षांचा. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती याव्यात म्हणून सगळ्यांचं राजकीय पक्षांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाने बंड केले आणि भाजपचे समर्थन केले. यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर आली. आता मुंबई महापालिकेत कमळ फुलणे हेच भाजपचे लक्ष आहे. मात्र करदात्या मुंबईकरांच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करणे याकडे दुर्लक्षच आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्तेत कोणी विराजमान झाले, तरी मुंबईकरांच्या समस्या जैसे थे राहणार यात दुमत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in