शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

सोमय्या यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांचे नाव जबानीदरम्यान घेतले होते, असे कोर्टासमोर सांगावे, अशी धमकी तिला देण्यात आली आहे.

गोरेगावमधील १,०३४ कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याशी संबंधित शिवसेना खासदार संजय राऊत यांची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू असून, आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. या घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात दिलेला जबाब बदलावा, यासाठी धमक्या मिळत असल्याची तक्रार साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी आणि चित्रपट निर्माती स्वप्ना पाटकर यांनी आपल्याला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. सोमय्या यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांचे नाव जबानीदरम्यान घेतले होते, असे कोर्टासमोर सांगावे, अशी धमकी तिला देण्यात आली आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात संजय राऊत यांची ‘ईडी’समोर चौकशी सुरू असून, या प्रकरणात स्वप्ना या साक्षीदार आहेत. याआधी स्वप्ना यांची ‘ईडी’ने चौकशी केली असून, त्यांनी आपला जबाब ‘ईडी’कडे नोंदवला आहे.धमकी देणाऱ्यांकडून स्वप्ना पाटकर यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. त्यांचा मोबाइलही हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच गेल्या काही दिवसांपासून ही धमकी मिळत असून, त्यांना मानसिक त्रासही दिला जात असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांचा मोबाइल क्रमांक सार्वजनिक ठिकाणी लिहिण्यात आला आहे, तर घरी येणाऱ्या वृत्तपत्रातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संजय राऊत गैरहजर

चौकशीसाठी संजय राऊत ‘ईडी’समोर हजर राहू शकले नाहीत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रकाराचे कारण देत त्यांनी गुरुवारी हजर राहता येणार नाही, असे सांगून ‘ईडी’कडे आणखीन वेळ मागितला होता. आता या प्रकरणावर ७ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. याआधीही २० जुलै रोजी राऊत यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळीही त्यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत सूट मागितली होती; पण ‘ईडी’ने ती मान्य केली नव्हती. त्यानंतर त्यांना २७ जुलै रोजी हजर राहण्याकरिता दुसरे समन्स बजावण्यात आले होते.

पत्राचाळ प्रकरण काय आहे?

गोरेगाव येथील पत्राचाळ जमीनप्रकरणी एक हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते; मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. पत्राचाळ प्रकरणात चौकशी सुरू असलेले सुजित पाटकर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत. स्वप्ना पाटकर या सुजित पाटकर यांच्या पत्नी होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in