मुंबई : रखडलेले प्रकल्प, लोकलचे विस्कळीत वेळापत्रक आणि लोकलऐवजी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना देण्यात येत असलेले प्राधान्य अशा विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी २२ ऑगस्ट रोजी शुभ्रवस्त्र परिधान करण्याचा निर्णय संघटनांनी जाहीर केला आहे. राज्य सरकारकडून भूमिअधिग्रहणाची प्रक्रिया लांबल्याने अनेक प्रकल्प रखडले आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याचे प्रयत्न संघटनांकडून सुरु आहेत.
रेल्वे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल रेल्वे प्रवासी संघटनांची मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रजनीश कुमार गोयल यांच्यासोबत बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ठाणे रेल्वे पोलिसांनी प्रवासी संघटनांना दिलेल्या नोटीसचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. तसेच नियोजित आंदोलन मागे घेण्याचे आवाहन गोयल यांनी केले. परंतु, या बैठकीत कोणताही सकारात्मक निर्णय जाहीर न केल्याने प्रवासी संघटना आंदोलनावर ठाम राहिल्या.
लोकलची गर्दी, विलंबाने धावणाऱ्या लोकल, तांत्रिक बिघाडामुळे लोकल विस्कळीत होणे याबाबत प्रवाशांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यात येणार आहे. प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक सोसायट्यांनी प्रवाशांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या चळवळीत सामील व्हावे, असे आवाहन मुंबई रेल्वे प्रवासी संघाने केले आहे.