
मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेली ५५० मेट्रिक टन वजनी उत्तर बाजूची तुळई (गर्डर) रेल्वे भागात सरकविण्याची कार्यवाही यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी रात्री ०१.३० ते मध्यरात्री ४.०० या अडीच तासांच्या कालावधीत वाहतूक व वीजपुरवठा या दोन्ही घटकांमध्ये घेतलेल्या स्पेशल ब्लॉकदरम्यान तुळई सरकविण्याची आव्हानात्मक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
रविवार, २६ जानेवारी रोजी तुळई सरकवण्याची कार्यवाही पूर्ण होण्यास १२ मीटर अंतर शिल्लक असताना काही तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला होता. मात्र, महानगरपालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून, तांत्रिक अडचणींवर मात करत तुळई सरकविण्याची कार्यवाही शुक्रवार ३१ जानेवारी रोजी पूर्ण केली आहे, तर मध्य रेल्वेच्या 'ब्लॉक' नंतर लोखंडी तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व मध्य रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाखाली हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. आता, मध्य रेल्वेने 'ब्लॉक' घेतल्यानंतर लोखंडी तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
तुळई स्थापितची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाजाचे नियोजन करून टप्पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती पालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात आली आहे.
जून महिन्यापर्यंत पूल वाहतुकीस खुला होणार
वेळापत्रकानुसार कार्यवाही पूर्ण झाल्यास जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. ॲण्टी क्रॅश बॅरिअर्स, विजेचे खांब उभारणी ही कामे समांतरपणे पूर्ण केली जातील.