नाल्यातील उग्र दुर्गंधीने जनतेला नरकयातना! मुख्यमंत्र्यांची गाडगेबाबांची भूमिका फोटोपुरती नको!

उपनगरातील तुडुंब भरलेल्या गटारे आणि मोठ्या नाल्यातील उग्र दुर्गंधीने जनता नरकयातना भोगत असून आरोग्याच्या विविध प्रकारच्या आजाराने बळी पडत आहे.
नाल्यातील उग्र दुर्गंधीने जनतेला नरकयातना! मुख्यमंत्र्यांची गाडगेबाबांची भूमिका फोटोपुरती नको!

रमेश औताडे/मुंबई

स्वच्छता अभियान सुरू करून हातात झाडू घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या गाडगेबाबाच्या रूपात असले तरी, उपनगरातील तुडुंब भरलेल्या गटारे आणि मोठ्या नाल्यातील उग्र दुर्गंधीने जनता नरकयातना भोगत असून आरोग्याच्या विविध प्रकारच्या आजाराने बळी पडत आहे. दाटीवाटीने राहत असलेली ही जनता सूर्यप्रकाशाअभावी अनेक आजारांचा सामना करत असताना त्यात भर म्हणून या गटार व मोठ्या नाल्याच्या उग्र दुर्गंधीने जनता त्रस्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हातात झाडू घेऊन फोटोपुरती गाडगेबाबांची भूमिका प्रसिद्धी माध्यमातून आम्हाला दाखवू नये, असा सवाल या ठिकाणी राहत असलेली त्रस्त जनता करत आहे.

उपनगरातील नाले व गटारे सांडपाण्याऐवजी कचरा व घाणीने तुडूंब भरली असून त्यामुळे परिसरात डासांची पैदास वाढली आहे. मानखुर्द येथील डॉ. आंबेडकर नगर व विलास गोपले नगरमधून वाहणारा नाला, गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छ करण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डास, दुर्गंधीने रोगराई पसरली आहे.

महानगरपालिकेच्या एम. पूर्व विभागांतर्गत प्रभाग क्रमांक-१४२ मधील चित्र जवळपास उपनगरासारखेच आहे. उपनगरातील जवळपास सर्वच झोपडपट्ट्यांतील गटारे, नाले व पर्जन्य जलवाहिन्यांनी सध्या कचरापट्टीचे रूप धारण केले आहे. या दुर्गंधी भागातील लोकप्रतिनिधी उचभ्रू कॉलनीत करोडो रुपयांच्या घरात वास्तव्यास असतात. मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभागात येणारे हे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमच्यासोबत का वास्तव्य करत नाहीत? कारण ते आजारी पडतील म्हणून... अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील त्रस्त नागरिक रमेश कदम यांनी दिली.

महानगरपालिकेच्या दत्तक वस्ती योजनेच्या माध्यमातून साफसफाईची कामे होत असतात. मात्र नालेसफाईचे काम वर्षातून एकदाच पावसाळ्यापूर्वी केले जाते.

कंत्राटदार श्रीमंत, पालिकेची यंत्रणा अदृश्य

नाल्यात कचरा टाकू नये म्हणून पालिकेने भिंत बांधली आहे. वाढती लोकसंख्या पाहता कचरा व्हीलेवाट करणारी पालिकेची यंत्रणा असूनही ती अदृश्य असून कंत्राटदार श्रीमंत झाला आहे. नाल्यातील कचरा उचलण्याचे प्रमाण कमी झाल्याने नालेसफाईसंदर्भात महानगरपालिकेकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत आहोत. मात्र आमच्या तक्रारींची दखल घेत नाहीत. नालेसफाई न केल्यास याच नाल्यातील कचरा महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात आणून टाकू, असा इशारा देऊन अनेक वेळा कृतीसुद्धा केली होती. तरीही पालिका व कंत्राटदार काहीच उपाययोजना करत नाहीत, असे या भागातील नागरिक बोलत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in