पालिका रुग्णालयांचा दर्जा सुधारणार! कमतरता शोधण्यासाठी ऑडिट करणार

अतिरिक्त आयुक्तांची रुग्णालयात ‘सरप्राइज व्हिजिट’
पालिका रुग्णालयांचा दर्जा सुधारणार! कमतरता शोधण्यासाठी ऑडिट करणार

मुंबई : पालिका रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सरप्राइज व्हिजिट देत रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला.
पालिका रुग्णालयांतील स्वच्छता, रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालयीन स्टाफ यांच्यात होणारे वाद टाळणे, एकूणच रुग्णालयातील कमतरता शोधत दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयाचे ऑडिट करण्यात येणार आहे. केंद्रीय स्तरावर दर्जा सुधारत रुग्णालयात अद्यावत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सच्या निर्देशानुसार काम होणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

स्वस्त व योग्य उपचारपद्धती यामुळे मुंबई पालिकेच्या रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यात हजारो रुग्ण मोठ्या विश्वासाने पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येतात. परंतु रुग्णालयातील अपुरा कर्मचारी वर्ग, रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालयीन स्टाफ यांच्यात होणारी बाचाबाची यामुळे रुग्णालयीन कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात अडचण निर्माण होते. यावर उपाय म्हणून रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका रुग्णालयांत असलेल्या कमतरतांवर आगामी एक ते दीड वर्षात व्यापक मोहीम राबवून कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.

असे होणार ऑडिट!
नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सच्या निर्देशांनुसार सार्वजनिक सेवेतील रुग्णालयांचा दर्जा असणे अनिवार्य असते. या पार्श्वभूमीवर ‘एनएएचबी’च्या धर्तीवर पालिका रुग्णालयात असणारे इन्फ्रास्ट्रक्टर, मनुष्यबळ, कामाची पद्धत, डॉक्युमेंटेशन अशा पातळ्यांवर ‘ऑडिट’ होणार आहे. या सेवांमधील असणारी तफावत आगामी काळात दूर करून अद्ययावतीकरण केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी दिली.

अधिष्ठातांची समिती !
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह इतर सर्वच रुग्णालयांमध्ये विविध पातळ्यांवर एकूण २० ते ३० टक्के पदे रिक्त आहेत. याचा मोठा परिणाम पालिकेच्या आरोग्य सेवेवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डीनची कमिटी नेमण्यात आली असून डॉक्टरांसह सर्वच रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.

अशी आहे पालिकेची आरोग्य यंत्रणा
- चार वैद्यकीय महाविद्यालये
- विशेष रुग्णालय - कस्तुरबा
- १६ उपनगरीय रुग्णालये
- १९१ दवाखाने
- २१२ हेल्थ पोस्ट
- १६४ आपला दवाखाना

logo
marathi.freepressjournal.in