राज्यात पावसाचा कहर सुरूच, अनेक गावांना पुराचा विळखा पडला

मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा कहर सुरूच, अनेक गावांना  पुराचा विळखा पडला

राज्यात गेले काही दिवस पावसाचा कहर सुरूच असून काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे, तर काही ठिकाणी गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्याजवळ राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १०९.९ मिमी. पाऊस झाला असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून, जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या इशारा पातळीखाली वाहत आहेत. जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नसून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १०६.३ मिमी. पाऊस झाला आहे. तर मुंबईत कुलाबा येथे ३२.८ मिमी तर सांताक्रूझ येथे ६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

खडकवासला धरण १०० टक्के भरले

पुण्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रायगड जिल्ह्यात ९६.८ मिमी पाऊस झाला असून, कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच नऊ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ६३.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३५.५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

अतिवृष्टीचा इशारा

नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९४.६ मिमी. पाऊस झाला असून, नाशिक जिल्ह्याकरिता पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून २८४.१६ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in