
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या अडचणींत दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसून येत आहे. राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम झाले असल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेकडून त्यांना नोटीस पाठिण्यात अली असून बुधवारी महापालिकेचे पथक त्यांच्या फ्लॅटची तपासणी करणार आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांचे खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करण्यात आले आहे, पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याच्या तक्रारी महापालिकेस मिळाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार या इमारतीमधील अनेक सदनिकाधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्याप्रमाणेच राणा यांच्या घरालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
नवनीत आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर राणा दाम्पत्याने त्यापासून माघार घेतली होती. पण, पोलिसांच्या कारवाईपासून त्यांची सुटका झाली नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. गेल्या दहा दिवसांपासून राणा दाम्पत्य कोठडीत आहे. अशावेळी मुंबई पालिकेच्या नोटिशीमुळे या दोघांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.