
खरे तर निकालापूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंना फोन करूनही त्यांनी घेतले नाहीत,” असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमध्ये भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत शनिवारी केला.“आमच्यासोबत षड्यंत्र झाले, चंद्रकांतदादा आपण भोळे लोक आहोत. युतीच्या काळात आपण शिवसेनेविरोधातील बंडखोर उमेदवार मागे घेतले; पण निकालापूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले होते. निकालापूर्वीच आपले सर्व मार्ग खुले आहेत, असे शिवसेना नेते सांगत होते. उद्धव ठाकरेंना फोन करूनही त्यांनी घेतले नाहीत. नंबर गेमसाठी शिवसेनेने भूमिका घेतली नाही”, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.
“जनतेने निवडून दिलेले सरकार आता सत्तेत आले आहे. जशी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत झाली, तशी आता त्यांच्या पक्षाबरोबर झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्या ३० दिवसांत केवळ स्थगिती देण्यात आली, आपल्या सरकारमध्ये केवळ प्रगती होत आहे,” असेही फडणवीस म्हणाले.
शेरोशायरीद्वारे विरोधकांना इशारा
“मेरी हिंमत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कही तुफानों का रोख मोड चुका हू मैं”, अशी शायरी उद्धृत करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला. ‘आधीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार म्हणाले की, आधीच्या सरकारमध्ये लेना बँक होती, आता देना बँक आली आहे’, असा हवालाही फडणवीसांनी यावेळी दिला. “अडीच वर्षांचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. विरोधी पक्षात असताना आपला पक्ष डिटेक्टिव्ह होता, सरकारमध्ये आता सुपर अॅक्टिव्ह झालो आहोत. सेनापतीच्या मागे कार्यकर्ते भक्कम राहिले की, लढाई जिंकतोच, तिकडे सेनापती झाले, मात्र मागचे सरदार पळून गेले”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.