भारतीय शेअर बाजारातील चढता आलेख दिवसअखेरीस घसरला, सेन्सेक्समध्ये १०० अंकांनी घट

सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स ३२६.८४ अंकांनी तर निफ्टी ८३.३० अंकांनी वधारला होता.
 भारतीय शेअर बाजारातील चढता आलेख दिवसअखेरीस घसरला, सेन्सेक्समध्ये १०० अंकांनी घट

युरोपियन बाजारात घसरणीने प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात दिवसभरातील चढता आलेख दिवसअखेरीस घसरला. सेन्सेक्समध्ये १०० अंकांनी घट झाली. एफएमसीजी, बँका आणि आयटी कंपन्यांच्या समभागांची विक्री झाली. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स ३२६.८४ अंकांनी तर निफ्टी ८३.३० अंकांनी वधारला होता.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स १००.४२ अंक किंवा ०.१९ टक्का घसरुन ५३,१३४.३५ वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २४.५० अंक किंवा ०.१५ टक्का घसरुन १५,८१०.८५ वर बंद झाला. तत्पूर्वी, मंगळवारी सकाळी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ६३१.१६ अंकांनी वधारत दिवसभरातील ५३,८६५.९३ ही कमाल पातळी गाठली होती. बँका, धातू, ऊर्जा आणि फार्मा कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली होती. परंतु बाजार बंद होत असतानाच आयटी, एफएमसीजी आणि काही निवडक बँकांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याने चढता आलेख घसरला.

सेन्सेक्सवर्गवारीत आयटी समभाग सर्वाधिक १.७३ टक्के, विप्रो १.५८ टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा १.२ टक्के, एल ॲण्ड टी १.१२ टक्के, मारुती १.१ टक्के आणि इंडस‌्इंड बँक ०.९८ टक्का, इन्फोसिस ०.७७ टक्का, टीसीएस ०.५७ टक्का, ॲक्सिस बँक, एशियन पेंटस‌् आणि एचडीएफसी, एचडीएफसी बँक यांच्या समभागातही घसरण झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा ०.८ टक्का, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.९२ टक्का यांच्या समभागात वाढ झाल्याने सेन्सेक्सची मोठी घसरण रोखली गेली. तसेच पॉवरग्रीड, बजाज फिनसर्व, सन फार्मा आणि टाटा स्टील यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात टोकियो, सेऊलमध्ये वाढ तर शांघायमध्ये किरकोळ घसरण झाली. अमेरिकन बाजाराला सोमवारी सुट्टी होती. तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत नकारात्मक वातावरण होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड तेल ०.८८ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ११२.५ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भारतीय शेअर बाजारातून २,१४९.५६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in