मुंबई : हृदयविकाराच्या झटक्याचा धोका ओळखण्यासाठी ट्रॉपोनिन टी चाचणी नायर रुग्णालयात मोफत उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या रुग्णालयात ही चाचणी पहिल्यांदाच उपलब्ध होत असल्याने गरजू रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.
बदलती जीवनशैली, फास्ट फूडचे अतिसेवन, झोपेचा अभाव आणि ताण यामुळे सध्या हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोणत्याही वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे. हृदयविकाराचा झटका आता कर्करोगापेक्षाही प्राणघातक झाला आहे. त्यामुळे आता हृदयविकारासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याचा धोका ओळखण्यासाठी सध्या रुग्णांना खासगीत तब्बल १५०० ते २००० रुपये मोजून ट्रॉपोनिन टी चाचणी करावी लागते. सर्वसामान्य रुग्णांना ही चाचणी करणेदेखील परवडत नव्हते. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी याबाबत प्रयत्न केले. ट्रॉपोनिन टी चाचणी रुग्णालयात उपलब्ध काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता दोन महिन्यात ही चाचणी नायर रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जनरल मेडिसिन आणि कार्डियाकमध्ये येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याच्या धोका असलेल्या रुग्णांची ही चाचणी करण्यात येणार आहे.