निवडणुका अन् उद्घाटनांची लगीनघाई

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका असो सर्वंच राजकीय पक्षांचे लक्ष मुंबई महापालिकेवर. मुंबईत टाचणी पडली तरी त्याची चर्चा जगभरात होते.
निवडणुका अन् उद्घाटनांची लगीनघाई
Published on

दर पाच वर्षांनी पार पडणाऱ्या निवडणुकीत आपण काय केले आणि पुढील पाच वर्षांत काय करणार, याचा प्लॅन मतदारराजासमोर मांडण्यात नेतेमंडळी तरबेज असतात. त्यात यंदाचे वर्ष हे निवडणूक वर्ष, आगामी लोकसभा, विधानसभा व मुंबई महापालिकेच्या निवडणुका. पुढील महिना, दोन महिन्यांत लोकसभेची निवडणूक पार पडणार याचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीत विजयाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड महत्त्वपूर्ण ठरणार यात दुमत नाही. परंतु संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येण्यास मे महिना उजाडणार. तरीही ‘आम्ही करून दाखवलं’ यासाठी दक्षिण मुंबईत जाणाऱ्या थडानी जंक्शनस वरळी ते मरीन ड्राइव्हदरम्यान चार लेनची एक मार्गिका अंशत: वाहतुकीसाठी खुली करण्याचा सत्ताधारी राजकीय पक्षांचा हट्ट. चर्चेत असलेल्या गोखले पुलाचे काम परफेक्ट कधीपर्यंत पूर्ण होईल, याचा अंदाज प्रशासकीय यंत्रणेला नसावा. तरीही राजकीय हट्टापायी गोखले पुलाची एक लेन सुरू करण्यासाठी प्रशासकाने कंबर कसली आहे. कोस्टल रोड असो वा गोखले पूल, एक लेन सुरू न करता काम पूर्ण झाल्यावर सुरू केला तर मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या दूर होण्यास निश्चितच मदत होईल. परंतु आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही केले हे दाखवण्याची काही राजकीय पक्षांना घाई झाली असावी म्हणून उद्घाटनाची लगीनघाई झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका असो सर्वंच राजकीय पक्षांचे लक्ष मुंबई महापालिकेवर. मुंबईत टाचणी पडली तरी त्याची चर्चा जगभरात होते. त्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका म्हटलं तर राजकीय पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी आतुर असणे स्वाभाविक आहे. ‘सोन्याचं अंडं देणारी कोंबडी’ म्हणून मुंबई महापालिकेकडे बघण्याचा नेते मंडळींचा दृष्टिकोन. आर्थिक कोंडीत सापडत असलेल्या मुंबई महापालिकेकडे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत नाही. त्यात मालमत्ता कर, पाणीपट्टी वाढ याला राजकीय विरोध. विरोध हा मुंबईकरांवर कुठलाही आर्थिक बोजा पडू नये म्हणून नाही, तर आम्ही करवाढीला विरोध केला आणि प्रशासकाने करवाढ टाळली हेच दाखवण्याचा नेतेमंडळींचा प्रयत्न. हे सगळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन पद्धतीने मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी खेळी खेळली जात आहे. कामे अपूर्ण असताना उद्घाटन का, असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु उद्घाटनाआधी आणि उद्घाटनानंतर मुंबईभर पोस्टर्स बॅनर्स झळकवत आम्ही केले हे दाखवण्याचा नेते मंडळींचा प्रयत्न, हेही तितकेच खरे.

यंदाची निवडणूक तर अधिकच रंगतदार होणार आहे. दोन राजकीय मित्र पक्ष भाजप व शिवसेना खुर्चीच्या लालसेपोटी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी दोन हजार किमीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनही तातडीने कामाला लागली आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी सहा कोटींचे कंत्राट दिले. उपनगरातील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचा पत्ता नाही, त्यात शहरातील ७२ किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवडणुका जाहीर होताच हे आम्ही केले असा बनाव राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते करणार, तर सिमेंट काँक्रीटच्या रस्तेकामात भ्रष्टाचार, स्ट्रीट फर्निचरमध्ये भ्रष्टाचार असा आरोप महाविकास आघाडीचे नेतेमंडळी करणार. त्यामुळे राजकीय पक्षांचे आरोप-प्रत्यारोप हे तुम्हा-आम्हाला सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी नाही, तर सत्ता स्थापनेसाठी. त्यामुळे जे काम अद्याप झाले नाही, त्या कामाचा गवगवा करण्यासाठी नेते मंडळींना उद्घाटनाची घाई, हेही तितकेच खरे.

निवडणुका जवळ आल्या की, मतदारांची आठवण राजकीय पक्षांना होतेच. आगामी लोकसभा विधानसभा व मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सुविधांचा वर्षाव होणे सहाजिकच आहे. परंतु कामे अपूर्ण असताना फक्त अन् फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नेतेमंडळी आतुर झाली आहेत. अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम आजही अपूर्ण. संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येण्यास मे महिन्याची प्रतीक्षा. त्यामुळे फक्त अन् फक्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी नेते मंडळींना उद्घाटनाची घाई लागली आहे.

उड्डाणपूल रखडले, श्रेयवादासाठी लढले

हँकॉक पूल काम पूर्ण होण्याआधीच तीन वेळा उद्घाटन, पाच वर्षे रखडलेला डिलाईल रोड पूल मुंबईकरांच्या सेवेत येणार, या अपेक्षेवर राजकीय नेत्यांनी अनेकदा पाणी फेरले. डिलाईल रोड पुलाचे उद्घाटन कोण करणार, हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. वादावादीनंतर डिलाईल रोड पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कल्पना चावला चौकदरम्यान वाहतूककोंडी फोडण्यासाठी बोरिवली पश्चिमेकडील आर. एम. भट्टड मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याआधी भाजप, ठाकरेंची शिवसेना आमनेसामने आली. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडच्या नामकरणावरून ठाकरे विरुद्ध भाजप सामना पहावयास मिळाला. त्यामुळे काम पूर्ण होण्याआधीच उद‌्घाटनाची घाई ही तुम्हा-आम्हाला होते. सुविधा मिळाव्यात म्हणून नाही, तर आम्ही जनतेचे कैवारी, असा आव आणण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न.

logo
marathi.freepressjournal.in