
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांकडून कर्जाने घेतलेल्या आलिशान गाड्या वेगवेगळ्या राज्यात विकून अथवा गहाण ठेवून कोट्यवधी रुपये मिळवणाऱ्या सात जणांच्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेने गजाआड केले.
नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदीप शर्मा या इसमाने घाटकोपर येथील एका वित्त कंपनीकडे बनावट कागदपत्रे सादर करून सोळा लाखांचे कर्ज मंजूर करून घेत आलिशान कार खरेदी केली होती. ती कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आल्यावर याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.
गुन्हे शाखेच्या कक्ष तीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी यांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला असता त्या टोळीने त्याच पद्धतीने अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आले.
सारीच कागदपत्रे बनावट
टोळीने बँकांना सादर केलेली आधारकार्ड, पॅन कार्ड, वाहनांचे आरसी बुक, एमएमआरडीएचे देकारपत्र, बँक स्टेटमेंट, आयटी रिटर्न कागदपत्रे बनावट होती. ही बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या टोळीचाही शोध घेण्यात येत आहे. वाहने विकताना अथवा गहाण ठेवताना ही टोळी बनावट आरसी बुक वापरत असे आणि गाड्यांवर बनावट चेसिस आणि इंजिन क्रमांक टाकत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.