रेल्वे बोर्डाच्या 'या' निर्णयाने दिलासा; मध्य रेल्वेचे वेळापत्रक रुळावर येणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मध्य रेल्वेने २९ मे ते ३० जून दरम्यान ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. त्यावेळी मध्य रेल्वेने सीएसएमटी रेल्वे स्थानकातील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले. यानंतर मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्याऐवजी बिघडल्याचा अनुभव प्रवाशांना आला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मध्य रेल्वेने २९ मे ते ३० जून दरम्यान ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. त्यावेळी मध्य रेल्वेने सीएसएमटी रेल्वे स्थानकातील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले. यानंतर मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्याऐवजी बिघडल्याचा अनुभव प्रवाशांना आला. मध्य रेल्वेच्या लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या अर्धा ते एक तास उशिराने धावत असल्याचा अनुभव प्रवाशांना आला. याला कारण ठरला होता सीएसएमटी रेल्वे स्थानकातील रेल्वेचा नवीन इंटरलॉकिंग यंत्रणेचा नियम. आता रेल्वे बोर्डाने पूर्वीप्रमाणेच क्रॉसओव्हरवरून ७० मीटर पुढे गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा ‘लेटलतिफ’ कारभार कमी होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेने केलेल्या मेगाब्लॉकमध्ये आधुनिक नविन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवली. हे करताना रेल्वे बोर्डाने क्रॉसओव्हरबाबत नवीन नियम केले. नवीन यंत्रणा बसविल्यापासून २ जून पासून रोजच लोकलची वाहतूक ३० ते ३५ मिनिटे विलंबाने धावत आहे. लोकलचे वेळापत्रक सुरळित सुरु ठेवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन रोज काही लोकल रद्द करत असल्याने गाड्यांना गर्दी वाढते आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु होते. सीएसएमटी स्थानकातून शेकडो उपनगरीय लोकल आणि लांब पल्याल्या मेल-एक्सप्रेस धावतात. या गाड्यांना लवकर सिग्नल मिळत नसल्याने लोकलच्या वाहतूकीचे मात्र तीनतेरा वाजले आहेत. यामुळे प्रवासी हैराण झाले आहे.

त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून लोकल वाहतूक रोज तासभर उशीराने धावत होत्या. या यंत्रणेतील रुळांवरील क्रॉसओव्हरवरून नियम शिथीत करण्याची मागणी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे केली होती. त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून आता नव्या यंत्रणेत पुर्वीप्रमाणे क्रॉसओव्हरवरून ७० मीटर पुढे गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येणार आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकातून लांबपल्याच्या २४ डब्याचा मेल - एक्सप्रेस गाड्या चालविण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म क्रमांक १० ते ११ चे विस्तारीकरण केले आहे. त्याच बरोबर मेल- एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकल गाड्यांची हाताळणी सुरक्षित आणि संगणकीकृत प्रणालीतून व्हावी, यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सीएसएमटीमध्ये लावली आहे.

लोकलचे वेळापत्रक पाळण्यासाठी आणि प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाच्या सिग्नल ॲॅण्ड टेलिकॉम विभागाकडे परिपत्रकातील नियम शिथील करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे बोर्डाने सोमवारी मध्य रेल्वेला पुर्वीप्रमाणे क्रॉसओव्हरवरून ७० मीटर पुढे गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्याची परवानगी दिली आहे.यामुळे आता लोकलचे वेळापत्रक सुरळित होणार आहे.

रेल्वे बोर्डाच्या सिग्नल ॲॅण्ड टेलिकॉम विभागाच्या परिपत्रकानुसार रुळांवरील क्रॉसओव्हरवरून एक गाडी २५० मीटर पुढे गेल्याशिवाय त्या रुळांवरुन दुसरी गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. त्यातच क्रॉसओव्हरवर निर्धारित केलेल्या १५ किमी प्रतितास वेग मर्यादेसह अंतर पार करायला प्रत्येक मेल-एक्स्प्रेसला निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागायचा.

त्याचा परिणाम लोकलच्या सेवेवर होत होता. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात मुंबईत ये-जा करणाऱ्या मेल-एक्सप्रेसची संख्या पाहता याचा थेट परिणाम लोकलच्या सेवेवर होतो. मात्र, आत रेल्वे बोर्डाने नियमात शिथिल केले आहे. आता १५ दिवसांनी रेल्वेचे वेळापत्रक पूर्ववत होऊन प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in