शाळा गजबजणार

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ ऑनलाइन शिक्षणाद्वारे होणे अशक्य असल्याचे या कोरोना महामारीच्या काळात दिसून आले
शाळा गजबजणार

कोरोना महामारीमुळे गेली जवळजवळ दोन वर्षे शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेऊन विद्यार्जन करणे थांबले होते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाइन शिक्षण देऊन पूर्ण केला गेला; पण प्रत्यक्ष शिक्षण संस्थेमध्ये जाऊन शिकणे आणि ऑनलाइन शिक्षण घेणे यातील मर्यादा या दोन वर्षांच्या कालावधीत स्पष्टपणे दिसून आल्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ ऑनलाइन शिक्षणाद्वारे होणे अशक्य असल्याचे या कोरोना महामारीच्या काळात दिसून आले; पण कोरोनाच्या तीन लाटा आल्यामुळे विनाव्यत्यय शिक्षणसंस्था चालविणे अशक्य झाले होते. कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन झाले नसले आणि महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे अजून अस्तित्व जाणवत असले तरी सर्वत्र व्यापक लसीकरण झाल्याने आणि शालेय विद्यार्थ्यांनाही लस देणे शक्य झाले असल्याने एकंदरीत जनजीवन सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे; पण कोरोना रुग्णांची मुंबई, ठाणे यासह काही जिल्ह्यांमधील वाढती संख्या हा चिंतेचा विषय असला तरी शासनाने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. काही भागात कोरोनाचे रुग्ण दिसून येत असले तरी येत्या १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष नियमित रूपामध्ये सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील शाळांच्या घंटा पुन्हा नेहमीसारख्या घणघणणार आहेत. शिक्षकवर्गांसाठी शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत. आधीच्या निर्णयानुसार शाळा १३ जूनपासून सुरू होणार होत्या; पण त्यात बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांना १५ जूनपासून शाळेत बोलवावे, असा आदेश शिक्षण आयुक्तांनी काढला आहे. १३ आणि १४ जून या दोन दिवसांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण याकडे लक्ष द्यावयाचे आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्या दृष्टीने प्रबोधन करायचे आहे. शाळांनी शालेय परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, सर्व जण मास्कचा वापर करताहेत याकडे लक्ष द्यावे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखावे, तापमानाची नोंद घ्यावी आदी मार्गदर्शक सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सर्व सूचनांचे काटेकोर पालन केल्यास शालेय व्यवस्थापनास कोरोनाचे भय बाळगावे लागणार नाही आणि विद्यार्थी आणि पालकवर्ग निर्धास्तपणे, उत्साहाने २०२२-२०२३ या नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत करतील; मात्र शाळांमध्ये मास्कसक्ती करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी अलीकडेच म्हटले होते. मास्कसक्तीवरून संभ्रम निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याबद्दलच्या सुस्पष्ट सूचना देण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांसह अन्य शिक्षण मंडळांच्या शाळाही १५ जूनपासून सुरू होणार आहेत. प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण बंद असल्याने गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आता शाळा बंद ठेवणे योग्य होणार नाही, असे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील शाळा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील, असेही शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले; मात्र विदर्भातील उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटांची परिस्थिती लक्षात घेऊन त्या भागातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत; मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांना २४ जून रोजीच शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार आणि सर्व ती खबरदारी घेऊनच राज्यातील शाळा सुरू करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे स्वागत करायला हवे; पण राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शाळांना, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना योग्य ती सर्व काळजी घेण्याचा आग्रह धरणे गरजेचे आहे. कोरोना महामारीमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनातील हसत, खेळत, बागडत शिक्षण घेण्याची दोन वर्षे वाया गेली आहेत. शाळा बंद ठेवल्यामुळे विद्यार्थी एका मोठ्या आनंदास मुकले आहेत. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासावरही मर्यादा आली होती. त्या सर्व पार्श्वभूमीवर शाळा सुरू होत आहेत ही आनंदाची बाब आहे. कोरोना किंवा अन्य एखाद्या महामारीमुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ येणार नाही याची दक्षता सर्वांनीच घेण्याची गरज आहे. १५ जूननंतर घणघणणारा शाळांच्या घंटांचा नाद सदैव गुंजत राहायला हवा!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in