समुद्र गिळतोय जमीन...! रायगडचा ५५ हेक्टर किनारा जलमय

खारफुटी, छोट्या खाड्या, दलदली, वाळूचे किनारे यांचा समावेश असून जवळपास ३०० मीटर किनाऱ्याची धूप झाली आहे.
समुद्र गिळतोय जमीन...!  रायगडचा ५५ हेक्टर किनारा जलमय

खारफुटी, छोट्या खाड्या, दलदल, किनारपट्टी भाग यांचा समावेश असलेल्या किनारपट्ट्यांची गेल्या तीन दशकांमध्ये धूप झाली असून हा भाग जलमय झाल्याचे आढळून आले आहे. पुण्यातील ‘सृष्टी कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन’ने (एससीएफ) पर्यावरणाशी संबंधित ही खळबळजनक माहिती उघड केली आहे. सॅटेलाइट प्रतिमांच्या आधारे संशोधकांना रायगड जिल्ह्यातील देवघर किनारपट्टीचा ५५ हेक्टरचा भाग पाण्याखाली गेल्याचे आढळून आले आहे. या भागाचे आकारमान साधारणत: मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या दहापट आहे.

समुद्राची पातळी वाढल्याने होणारी क्षार जमीन आणि किनारपट्टीची होणारी धूप या विषयावर धोरणकर्त्यांना धोरण ठरविण्यासाठी सहाय्य व्हावे, यादृष्टीने ‘एससीएफ’ संशोधन करत आहे. या संशोधनादरम्यान बाणकोट खाडीच्या मुखाशी केलेल्या अभ्यासात प्राथमिक आकडेवारीनुसार १९९० ते २०२२ या कालावधीत सुमारे ५५ हेक्टरची किनारपट्टीवरील परिसंस्था नष्ट झाल्याचे आढळले आहे. यामध्ये खारफुटी, छोट्या खाड्या, दलदली, वाळूचे किनारे यांचा समावेश असून जवळपास ३०० मीटर किनाऱ्याची धूप झाली आहे.

‘एससीएफ’ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागावर सॅटेलाइट डेटासेट्स विकसित करून तपशीलवार अहवाल तयार करत आहे. गेल्या वर्षी, मुंबई महानगर क्षेत्रालगत असलेल्या खाड्या व जलमार्गांची रुंदी कमी होण्यासंदर्भातील मूल्यमापन आणि करंजा खाडीलगतच्या ६० चौ. फुटांहून अधिक खारफुटीचे क्षेत्र आकुंचित झाल्याचा अहवाल ‘एसएसीएफ’ने प्रकाशित केला होता. आता सॅटेलाइट प्रतिमांच्या आधारे संशोधकांना रायगड जिल्ह्यातील देवघरच्या किनारपट्टीचा ५५ हेक्टरचा भाग पाण्याखाली गेल्याचे आढळून आले आहे.

धूप होण्यास विकासकामे कारणीभूत

एकीकडे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे आणि दुसरीकडे किनारपट्टीच्या भागात वाळूचे उत्खनन केल्यामुळे किनाऱ्याचा नैसर्गिक चढ सपाट होत चालला आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी गावांमध्ये अधिक वेगाने शिरू लागले आहे. खाडीची खोली सतत होत असलेल्या वाळूच्या उत्खननामुळे वाढत आहे, त्यामुळे भरतीच्या व वादळाच्या वेळी अधिक पाणी वाहून येण्याच्या क्षमतेमुळे किनाऱ्यावरील अनेक भाग क्षारयुक्त होत आहेत. देवघरमध्ये किनारपट्टीच्या भागाची धूप होण्यास पुलांचे बांधकाम व संबंधित विकासकामेही कारणीभूत आहेत, असे अभ्यासात आढळून आले आहे.

किनारा ३०० ते ५०० मीटर सरकला

“सॅटेलाइटने निश्चित केलेला किनारा ३०० ते ५०० मीटर जमिनीच्या बाजूला सरकला आहे, असे निरीक्षणाअंती दिसून आले. याव्यतिरिक्त किनारपट्टीची धूप झाल्यामुळे खारफुटी आणि सुरूची झाडेही उन्मळून पडली आहेत”, असे ‘एससीएफ’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक आपटे यांनी सांगितले.

राज्यातील २५.५ टक्के किनारपट्टी भागाची धूप

देवघरच्या किनाऱ्याची धूप होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘गुगल अर्थ इंजिन’चा वापर करून लँडसॅट (सॅटेलाइट) डेटासेट्स गोळा करण्यात आले. ‘नॅशनल इन्सि्टट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी’ने किनाऱ्यावरील धूप या विषयाचे विस्तृत विश्लेषण केले. त्यानुसार १९९० ते २०१८ या कालावधीत महाराष्ट्रातील २५.५ टक्के किनारपट्टीच्या भागाची धूप झाल्याचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in