मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन ठरतेय जीवघेणी!

मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन म्हणून ओळख असलेली बेस्ट बसेस पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू लागल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे.
मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन ठरतेय जीवघेणी!

गिरीश चित्रे/मुंबई

मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन म्हणून ओळख असलेली बेस्ट बसेस पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू लागल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. जानेवारी २०२३ ते जानेवारी २०२४ या दोन वर्षांत बेस्टच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसचे १५८ अपघात झाले. या अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला असून १४१ जण जखमी झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. त्यामुळे मुंबईची दुसरी लाइफलाईन पादचाऱ्यांसाठी काळ ठरत आहे. दरम्यान, बेस्ट बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना व जखमींना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन म्हणून बेस्ट बसची जगभरात ओळख आहे. सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट बसला प्रवासी पसंती देतात. परंतु हीच दुसरी लाइफलाईन प्रवासी व पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. दादर टीटी खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्विनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डम्परला मागून धडक दिल्याची घटना २ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी चालकाच्या मृत्यूसह ३ जणांचा मृत्यू, तर ८ जखमी झाले होते. तर भांडुप येथे ११ ऑगस्ट २०२१ रोजी बेस्ट बस इलेक्ट्रिक कॅबिनवर धडकली होती. या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू तर दोन जखमी झाले होते. २२ जून २०२३ रोजी गिरगाव येथे बेस्ट बसला झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

गेल्या दोन वर्षांत बेस्ट बसेसच्या १५८ अपघातांत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४१ जण जखमी झाल्याचे बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

मुंबईकरांची पहिली लाइफलाईन असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत रोज १० जणांचा अपघात होत असून वर्षाला ४ हजार प्रवाशांना रूळ ओलांडताना जीव गमवावा लागतो, तर मुंबईची दुसरी लाइफलाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसेसच्या अपघात प्रवाशांसह पादचाऱ्यांना चिंतेत टाकणारे आहेत.

आर्थिक मदतीचा हात!

बेस्ट उपक्रमाच्या प्रचलित पद्धतीनुसार मोटार अपघात दावा न्यायाधिकरण येथे दाखल करण्यात येतो. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये न्यायाधिकरणाने दिलेल्या निवाड्यानुसार व राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सुमेटाने निकाली काढण्यात आलेल्या एकूण १२ प्रकरणांत जखमींना ९ कोटी ७८ लाग २२ हजार ९७६ रुपये व एकूण ५३ प्रकरणांमध्ये मृतांच्या कायदेशीर वारसांना ११ कोटी २२ लाख ६८ हजार ५६६ रुपये इतकी नुकसानभरपाई देण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

असे झाले अपघात

जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२४

एकूण बसेसचे अपघात - १५८

अपघातात ४१ जणांचा मृत्यू

एकूण १४१ जण जखमी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in