वॉश करण्यासाठी दिलेली कार घेऊन सुरक्षारक्षक पळाला

चोरी केलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे
वॉश करण्यासाठी दिलेली कार घेऊन सुरक्षारक्षक पळाला

मुंबई : वॉश करण्यासाठी दिलेली सुमारे पाच लाख रुपयांची कार घेऊन पळून गेलेल्या एका सुरक्षारक्षकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. हितेश ऊर्फ दिनेश गंगाराम लोणकर असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून, त्याच्याकडून अपहार केलेली कार लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जयेश प्रविणभाई चौहाण हे बोरिवलीतील आर. एम भट्ट रोडवरील भट्ट औरस अपार्टमेंटमध्ये राहत असून, त्यांच्या मालकीच्या तीन कार आहेत. या कार वॉश करण्यासाठी राजू नावाचा एक तरुण येतो.

कार वॉश केल्यानंतर तो चावी त्यांच्याकडे किंवा सोसायटीचा सुरक्षारक्षक हितेश लोणकर याच्याकडे देत होता. २१ ऑगस्टला हितेश कार वॉश करण्यासाठी त्यांच्याकडून चावी घेऊन गेला. बराच वेळ होऊनही तो चावी घेऊन आला. त्यामुळे ते पार्किंगजवळ आले होते. यावेळी त्यांना हितेश हा त्यांची पाच लाखांची फोर्ड कंपनीची इको स्पोर्ट कार घेऊन पळून गेल्याचे दिसून आले. सोसायटीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये हितेश हाच कार घेऊन सोसायटीच्या बाहेर जाताना दिसून आला.

त्यामुळे त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी हितेशचा शोध सुरू केला होता. दोन दिवसांपूर्वी हितेशला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in