शिंदे गट दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे एक खासदार आणि दोन ते तीन आमदार प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे
शिंदे गट दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात घमासान सुरू आहे. शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी दोघांचाही प्रयत्न सुरू आहे. नेमकी कोणाला परवानगी मिळणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही; मात्र शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली असून, किमान एक ते दीड लाखांची गर्दी जमवून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. जर शिवाजी पार्क येथे परवानगी मिळू शकली नाही, तर बीकेसी येथे मेळावा घेण्याचा पर्यायही शिंदे गटाने खुला ठेवल्याचे समजते. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे एक खासदार आणि दोन ते तीन आमदार प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे समीकरण गेली अनेक वर्षे आहे; मात्र शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेनेची कोंडी करण्याचा सर्वप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच आमचीच शिवसेना खरी, त्यामुळे शिवाजी पार्कवर आम्हीच दसरा मेळावा घेणर, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. ठाकरे गटाने तसेच शिंदे गटाने, दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. आता नेमकी कोणाला परवानगी मिळणार हे पाहावे लागणार आहे.

आणखी १५ नेते शिंदे गटाच्या वाटेवर 

शिवसेनेचे १० ते १५ नेते दसऱ्याला शिंदे गटात ‘सीमोल्लंघन’ करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे; मात्र एकनाथ शिंदे यांच्या धक्कातंत्राची उद्धव ठाकरे यांना आधीच कुणकुण लागल्याचे समजते. त्यामुळे दसऱ्यापूर्वीच या नेत्यांची हकालपट्टी करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in