
देशात सुप्रसिद्ध असलेले मुंबई बंदर प्राधिकरण ज्याला पूर्वी पूर्वी मुंबई पोर्ट ट्रस्ट म्हणून ओळखले जाते होते. त्या बंदराचा काही भाग येत्या ३० वर्षांसाठी खासगी कंपनीला देण्याचा विचार सुरू आहे. जो भाग खासगी कंपनीला दिला जाणार आहे, त्या भागातून मुंबई पोर्ट ४० टक्के माल हाताळणी केली जाते.
मुंबई बंदरातील काही ‘धक्क्यां’चे आधुनिकीकरण करण्याची केंद्र सरकार व मुंबई बंदर प्राधिकरणाची इच्छा आहे. त्यासाठी इंदिरा डॉकचे चार धक्के खाजगी कंपनीस हाताळण्यास देण्याचे निश्चित केले आहे. १८ ते २१ असे महत्वाचे चार धक्के आहेत. एकूण ६४० मीटर पर्यंतचे चार धक्क्यांव्यतिरिक्त खुले साठवणूक क्षेत्र २३,७०० चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. त्यापैकी १५,३०० चौरस मीटरच्या तीन जागा या खासगी कंपनीला दिल्या जातील. खासगीकरणासाठी जागतिक निविदा मुंबई बंदर प्राधिकरणाने मागवल्या आहेत. इंदिरा डॉकमधील या धक्क्याचे आधुनिकीकरण, सामुग्री, वापर व देखभाल आदी बाबी संबंधित कंपनीने करायच्या आहेत. हे काम खासगी-सार्वजनिक भागीदारी प्रकल्पातंर्गत केले जाणार आहे.
खासगी कंपनीला धक्का मजबूत करणे, साठवणुकीची क्षमता वाढवणे, माल हाताळणी यंत्रणेत सुधारणा करणे आदी कामे करावी लागतील. या बदल्यात त्या कंपनीला पुढील ३० वर्षे महसूल गोळा करता येईल. या प्रकल्पासाठी त्यांना अंदाजे १५० कोटी रुपये गुंतवावे लागतील. त्यात मुंबई बंदर प्राधिकरणाला १९.४५ कोटी रुपये आगाऊ द्यावे लागतील.
या खासगी कंपनीला मालाची हाताळणी, साठवणुकीची सुविधा, सहाय्यक सुविधा शुल्क आदींच्या रुपात महसूल मिळू शकेल. या महसुलावर त्यांना मुंबई बंदर प्राधिकरणाला प्रति मेट्रीक टन हाताळणीनुसार, रॉयल्टी द्यावी लागेल. जी कंपनी जास्तीत जास्त रॉयल्टी देण्याचे ठरवेल, त्यांना हे कंत्राट बहाल केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
या बंदरातील चार धक्क्यांवर लोखंड, स्टील, स्टीलच्या कॉईल्स, कडधान्य, वाहने, साखर व अन्य वस्तू हाताळल्या जातात. खाजगीकरणासाठी या चार धक्क्यांमधून हाताळल्या जाणाऱ्या एकूण मालापैकी सुमारे ६५ ते ७० टक्के लोह आणि स्टीलचा समावेश होतो. सध्या, मुंबई बंदर प्राधिकरणात कोणतीही सुसज्ज उपकरणे नाहीत. मालाची हाताळणी जहाज कंपन्यांद्वारे केली जाते. माल हाताळण्यासाठी संबंधित शिपिंग एजंट आवश्यकतेनुसार मोबाईल क्रेन तैनात करतात.
एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान मुंबई बंदरात ३.३२ मेट्रिक टन मालाची हाताळणी झाली. त्यातील १.३४ लाख मेट्रिक टन माल हाताळणी ही ‘हार्बर वॉल बर्थ’ या भागातून झाली. या भागातून ४०.३६ टक्के हाताळणी करण्यात आली. २०२१-२२ मध्ये चार धक्क्यातून ३७.८८ टक्के माल हाताळणी झाली. येते ३० वर्षे ‘हार्बर वॉल बर्थ’ या धक्क्यातून ३.५० मेट्रिक टन माल हाताळणी होण्याचा अंदाज आहे.
बंदराच्या धक्क्याचे आधुनिकीकरण गरजेचे
बंदरातील धक्क्यांचे आधुनिकीकरण गरजेचे आहे. हे धक्के १९०४ ते १९१४ या काळात बांधलेले आहेत. हे धक्के ८५२ मीटर लांबीचे आहेत. त्यापैकी ६४० मीटर लांबीचे खासगीकरण केले जाईल. उर्वरित २१२ मीटर लांबीची जागा ही भारतीय तटरक्षक दलाला ३० वर्षांसाठी ‘भाडेपट्टी’ने दिली आहे, असे एका बंदर अधिकाऱ्यांने सांगितले.