कुर्ल्यातील स्कायवॉक रखडलेलाच!

पुढल्या वर्षीच सेवेत; कंत्राटदाराला फक्त २५ हजारांचा दंड
कुर्ल्यातील स्कायवॉक रखडलेलाच!

मुंबई : कुर्ला पश्चिम लालबहादूर शास्त्री मार्गावर नागरिकांना रस्ता ओलंडण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता, पालिकेने स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील दोन वर्षापासून या स्कायवॉकचे काम रखडलेले आहे. कुर्ल्यातील रखडलेले स्कायवॉक २३ एप्रिल २०२४ मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. स्कायवॉकचे काम रखडल्याने कंत्राटदारास फक्त २५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, कुर्ल्यातील रखडलेला स्कायवॉक पुढल्या वर्षीच सेवेत येईल, हे स्पष्ट झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे कुर्ला पश्चिम येथील रखडलेल्या स्कायवॉकबाबत विविध माहिती विचारली होती. मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाचे सहाय्यक अभियंता अमित भंडारी यांनी कळवले की, १८ ऑगस्ट २०२१ रोजी एनए कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कार्यादेश जारी केले. १५.४० कोटींचे कंत्राट असून १५ महिन्यात काम पूर्ण करणे आवश्यक होते. कुर्ला पश्चिम भेरूलाल मार्गावरील बीकेसी येथील टॅक्सी मेन कॉलनीपासून न्यू मिल रोड येथील श्रीकृष्ण चौकापर्यंत स्कायवॉकचे काम मागील २५४ दिवसापासून बंद आहे. कंत्राटदारावर केवळ २५ हजारांचा दंड आकारला आहे. सद्यस्थितीत काम पावसाळ्यात बंद आहे.

मुदतीत काम पूर्ण होणे अपेक्षित!

नागरिकांसाठी हा स्कायवॉक महत्त्वाचा असून दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून एलबीएस मार्ग ओलंडतात. यामुळे काही वेळेला वाहतूक प्रभावित होते. पालिकेने मुदतवाढ दिली असली तरी या मुदतीत काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in