गणेशोत्सवाची धुम! कागदपत्राअभावी ३७३ मंडळांचे अर्ज फेटाळले

गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ३,७६७ अर्ज; आतापर्यंत २,७२९ मंडळांना परवानगी
गणेशोत्सवाची धुम! कागदपत्राअभावी ३७३ मंडळांचे अर्ज फेटाळले

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप परवानगीसाठी सोमवार १८ सप्टेंबरपर्यंत एकूण ३,७६७ अर्ज प्राप्त झाले; मात्र कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ३७३ मंडळांचे अर्ज फेटाळण्यात आले. तर २,७२९ मंडळांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने परवानगी देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी १ ऑगस्ट, २०२३ पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत १२ हजारांहून अधिक मंडळे

मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून, मंडप परवानगीसाठी १ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर दरम्यान एकूण ३,७६७ अर्ज पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाले. यापैकी ६६५ अर्ज डुप्लिकेट अर्थात अर्जाची प्रक्रिया दोन वेळा केल्याचे निदर्शनास आले. तर सहाय्यक अभियंता परीक्षण यांनी ३३० मंडळांना परवानगी नाकारली.

वाहतूक पोलिसांनी २६ अर्ज नाकारले

वाहतूक पोलिसांनी २६ अर्ज नाकारले असून, स्थानिक पोलिसांनी ११ अर्ज फेटाळले. तर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी ६ असे एकूण ३७३ मंडळांचे मंडप परवानगीचे अर्ज फेटाळले असून, कागदपत्रांची पूर्तता केल्यास या मंडळांना परवानगी देण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मंडळांकडून अर्जाची प्रक्रिया सुरू

प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्जांच्या परवानग्यांमध्ये वाहतूक, स्थानिक पोलीस तसेच मुंबई महापालिकेच्या कार्यालयीन परवानगीचा समावेश असतो. मुंबईतून परवानगीसाठी मंडळांकडून अर्जाची प्रक्रिया सुरू असून, कागदपत्रांची पूर्तता केलेल्या मंडळांना परवानगी दिल्याने परवानगी प्राप्त करणाऱ्या मंडळांची संख्या वाढेल, असे ही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंतची स्थिती

-आलेले एकूण अर्ज - ३,७६७
-दुबार आलेले अर्ज - ६६५
-परवानगी दिलेली संख्या - २,७२९
-अर्ज फेटाळले - ३७३

पर्यावरणपूरक गणपती म्हणून ख्याती मिळवलेल्या गिरगावच्या राजाचा मुखदर्शन सोहळा रविवारी पार पडला. 'छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी काय केले असतं', अशा संकल्पनेतून विविध चित्र या मंडळांनी मंडपात लावली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in