मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार १ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत खड्ड्यांच्या ४८ हजार ६०८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी मार्च २०२३ अखेरपर्यंत ३३ हजार ७९१ खड्डे कोल्डमिक्स व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे; मात्र शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात तब्बल १४ हजार ८१७ खड्ड्यांचे साम्राज्य आजही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागणार आहे. दरम्यान, मार्च २०२३ पर्यंतची आकडेवारी पालिका प्रशासनाकडून देण्यात आली असून, एप्रिल महिन्यातील खड्ड्यांची आकडेवारी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकार आणि पालिकेने येत्या दोन वर्षांत मुंबईचे काँक्रिटीकरण करून खड्डेमुक्त रस्ते करण्याचा निर्धार केला आहे. पुढील दोन वर्षांत ४०० किमी रस्तेबांधणीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, या कामासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी रिॲक्टिव्ह अस्फाल्ट व रॅपिड हार्डनिंग तंत्रज्ञानाने खड्डे बुजवण्यात येणार असून, शहर आणि उपनगरात तब्बल १२५ कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे. तर डांबर व खडी मिश्रणाने खड्डे बुजवण्यासाठी ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
खड्डे बुजवण्यासाठी 'रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट’
पालिकेने गेल्या काही वर्षांपासून खड्डे बुजवण्यासाठी ‘कोल्डमिक्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला; मात्र याची परिणामकता कमी होऊ लागल्याने पालिकेवर खड्ड्यांवरून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी नव्या पर्यायांचा शोध सुरू केला होता. यामध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ‘रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट’ तंत्रज्ञान योग्य ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी 'रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
----
पालिकेने खड्डे अटेंड केले -- चौरस मीटर
३३,७९१ -- ५१८५२.०२६२
कंत्राटदाराने अटेंड केलेले खड्डे - चौरस मीटर
१३,५०१ - ९६२६८.३४७
सेंट्रल एजन्सीने अटेंड केलेले खड्डे
१,३१६
--
एवढ्या ठिकाणी पालिकेने बुजवले खड्डे
शहर - ११,७९२
पश्चिम उपनगर - ११,०८४
पूर्व उपनगर - १०,९१५
---
खड्ड्यांची तक्रार येथे करा!
नागरिकांना मोबाइल अँपवर खड्ड्यांची तक्रार करता येणार आहे. ४८ तासात खड्डे बुजवण्याची ग्वाही पालिकेने दिली आहे. @mybmc वर ट्वीट करता येईल किंवा mcgm.gov.in या वेबसाईटवर तक्रार करता येईल. तसेच MCGM 24×7 हे अँप सुरु केले असून प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी १८००२२१२९३ हा टोल फ्री क्रमांक आहे. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील १९१६ या क्रमांकासह व्हॅट्सअॅप चॅटबोटवरही तक्रार करता येईल.