राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल -संजय राऊत

रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते
राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल -संजय राऊत

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे- पाटील यांना आश्वासन दिल्यानुसार राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. अन्यथा, महाराष्ट्र पेटेल, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला. एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे तर ती मेहेरबानी नाही, असे ठणकावताना राऊत यांनी शिंदे यांच्या शपथेची खिल्ली उडवली. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते, पण राहिलेत का, असा सवाल राऊत यांनी केला.

शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला. याशिवाय शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी कार्यरत राहणार असल्याचे शिंदे यांनी म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर राऊत यांनी आपल्या शैलीत टीका केली. ‘‘एकनाथ शिंदे यांचे भाषण भाजपला मजबूत करण्यासाठी होते. भाजपच्या संपर्कात आल्याने खोट्या शपथांचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही शपथा कसल्या घेता? बाळासाहेबांशी गद्दारी करता, महाराजांच्या महाराष्ट्रात पाठीत खंजीर खुपसता आणि शपथ काय घेता,’’ असा सवाल राऊत यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःचा आचार विचार नाही. जे भाजप सांगत आहे, तेच ते करत आहेत. काही दिवसांनी हे डोक्यावर काळी टोपी घालून फिरतील. रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते. ते आता शिवसेनेत राहिले का? भारतीय जनता पक्ष आमचा छळ करतो म्हणून जाहीर सभेत राजीनामा देणारे शिंदे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत,’’ अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in