
सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा आणि क्रूड तेलाचे वाढत्या दर लक्षात घेता रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसते. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली.
सेन्सेक्स सकाली ४५० अंकांनी घसरल्यानंतर त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली. दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ९३.९१ अंक किंवा ०.१७ टक्का घटून ५५,६७५.३२ वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १४.७५ अंक किंवा ०.०९ टक्का घटून १६,५६९.५५ वर बंद झाला.
सेन्सेक्सवर्गवारीत एशियन पेंटस्चा समभाग सर्वाधिक २.३६ टक्के घसरला. तर त्यानंतर अल्ट्राकटेक सिमेंट, बजाज फिनसर्व, नेस्ले इंडिया, एल ॲण्ड टी, ॲक्सिस बँक, डॉ. रेड्डीज आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लि.च्या समभागात घसरण झाली. तर टाटा स्टील, इंडस्इंड बँक, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात वाढ झाली.
आशियाई बाजारात टोकियो, शांघायमध्ये आणि युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.६१ टक्का वधारुन प्रति बॅरलचा भाव १२०.४ अमेरिकन डॉलर्स झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु आहे. त्यांनी शुक्रवारी ३७७०.५१ कोटींच्या समभागांची विक्री केली. तर भारतीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारच्या ७७.६४ स्तरावर बंद झाला.