Covid : मुंबईत कोरोना लसींचा साठा संपला ; ८ हजार मात्रा निकामी

कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन व कॉर्बोव्हॅक्स यापैकी कुठल्याही लसीच्या मात्राच उपलब्ध नसल्याने मुंबई महापालिका प्रशासनावर लसीकरण केंद्राचे दरवाजे बंद करण्याची वेळ
Covid : मुंबईत कोरोना लसींचा साठा संपला ; ८ हजार मात्रा निकामी
Published on

कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या कोव्हॅक्सीनचे ८ हजार डोस अक्षरशः फुकट गेले आहेत. लसीच्या मात्रा घ्या, असे आवाहन करूनही दुर्लक्ष करणाऱ्या लाभार्थींमुळे कोव्हॅक्सीनचे ८ हजार डोस ‘एक्सपायर’ झाले आहेत. आता कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन व कॉर्बोव्हॅक्स यापैकी कुठल्याही लसीच्या मात्राच उपलब्ध नसल्याने मुंबई महापालिका प्रशासनावर लसीकरण केंद्राचे दरवाजे बंद करण्याची वेळ आली आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागाची झोप उडाली. अखेर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट व हैदराबाद येथील कंपनीकडून कोबोवॅक्स लस उपलब्ध झाली. मुंबईत २६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मोफत लसीकरण, तर खासगी रुग्णालयात २५० रुपयांत लाभार्थींना लस उपलब्ध झाली होती. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईकरांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक व्यक्तीने दोन डोस घ्यावेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले.

पहिला डोस १०० टक्के, तर दुसरा डोस ९५ टक्के लाभार्थींनी घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णसंख्या २१ हजारांच्या घरात पोहोचली, तर रोज होणाऱ्या मृत्यूची संख्या १०० पार गेली. कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार रोखण्यासाठी तिसरा डोस बुस्टर डोस घ्या असे आवाहन करण्यात आले; मात्र तिसरा डोस आतापर्यंत केवळ १५ टक्के लोकांनी घेतला आहे.

दरम्यान, फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून, रोज वाढत जाणारी बाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर पाडणारी आहे. कोरोना पसरतोय डोस घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाकडून सतत करण्यात येत होते. तसेच लसीचा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी दोन महिन्यांपासून राज्य सरकारला पत्र लिहून केली आहे.

‘‘लसीच्या मात्रा उपलब्ध झाल्या नसून मुंबई महापालिका प्रशासनाकडे असलेला ८ हजार कोव्हॅक्सीनचा साठा आऊट डेटेट झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडे सद्यस्थितीत कुठल्याही लसीच्या मात्रा उपलब्ध नाहीत.’’

- डॉ. मंगला गोमारे आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

logo
marathi.freepressjournal.in