आरक्षणाचे वादळ दिल्लीत धडकणार! जाट-मराठा एकत्र लढणार, संयुक्त समिती स्थापन

आगामी संसद अधिवेशनाच्या काळात किंवा त्याआधी राजधानी दिल्लीत आंदोलन करण्याची योजना मराठा-जाट समुदायाच्या प्रतिनिधींनी आखली
आरक्षणाचे वादळ दिल्लीत धडकणार! जाट-मराठा एकत्र लढणार, संयुक्त समिती स्थापन
Published on

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, त्यांनी संपूर्ण राज्यात रान पेटवले आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला असून, यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. त्यातच आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर आणखी दबाव वाढविला जाणार असून, त्याचाच भाग म्हणून आता मराठा आरक्षणाच्या मागणीचे वादळ थेट दिल्लीत धडकणार आहे. त्यासाठी जाट समुदायही साथ देणार आहे. या संयुक्त लढ्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठीच जाट-मराठा संयुक्त संघर्ष समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राजधानी दिल्लीत काल तालकटोरा इंडोर स्टेडियमवर अखिल भारतीय जाट महासभेचे अधिवेशन पार पडले. यादरम्यान जाट महासभेचे पदाधिकारी आणि मराठा महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत आरक्षणाचा लढा संयुक्तपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या महाअधिवेशनात अनेक जाट नेते उपस्थित होते. या बैठकीत आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याची भूमिका घेतली असून, त्यासाठी मराठा समाजाला सोबत घेऊन ही लढाई लढण्याचे निश्चित केले आहे.

देशातील अनेक राज्यांत वेगवेगळ्या समुदायाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. राज्यातही मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत आरक्षणाच्या मागणीचा लढा अधिक तीव्र केला आहे. हरियाणात जाट समुदायानेही आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. दोन्ही समुदायांची मागणी एकच असल्याने आरक्षणाच्या मागणीसाठी आता जाट समुदाय आणि मराठा समाज एकत्र लढा देणार आहेत. आता आरक्षणाचे वादळ थेट दिल्लीत धडकणार असल्याने केंद्र सरकारवरही दबाव येण्याची शक्यता आहे.

वंचित घटकांना एकत्र आणणार

आरक्षणाच्या मागणीचा लढा अधिक तीव्र करण्याची जाट-मराठा समुदायाची योजना आहे. त्यासाठी आरक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांना सोबत घेऊन हा लढा अधिक तीव्र करण्याची यांची योजना आहे. यासंबंधी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी माहिती दिली. त्यामुळे हा संयुक्त लढा केंद्र सरकारला हादरा देणारा ठरण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या काळात आंदोलन

आगामी संसद अधिवेशनाच्या काळात किंवा त्याआधी राजधानी दिल्लीत आंदोलन करण्याची योजना मराठा-जाट समुदायाच्या प्रतिनिधींनी आखली. मराठा समाजाला ओबीसीतून २७ टक्क्यांमध्ये आरक्षण द्यावे किंवा केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी, या मागण्यांसाठी लढा उभारला जाणार आहे. त्यामुळे दिल्लीत आंदोलन भडकू शकते.

logo
marathi.freepressjournal.in