मुंबई : पगारवाढ, ड्युटीचे वेळापत्रक, मोफत बसचा प्रवास अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुलुंड घाटकोपर बस आगारातील ५०० हून अधिक कंत्राटी कामगारांनी बुधवारी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे काही तोडगा न निघाल्याने गुरुवारी ६ डेपोतील डागा ग्रुपच्या बसेस रस्त्यावर उतरणार नसून अन्य कंत्राटी कामगारांचा पाठिंबा मिळाल्याचे डागा ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी घाटकोपर व मुलुंड बस आगारातून १६० बसेस बाहेर न पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असून प्रवाशांना गुरुवारीही त्रास सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली असून बेस्टची बस सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, डागा ग्रुपच्या कंत्राटी चालकांनी बुधवारी काम बंद आंदोलन केल्याने डागा ग्रुपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे. दिवसेंदिवस महागाई आग ओकत असून तुंटपुज्या पगारावर कसा कारभार हाकणार, बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे आम्हालाही मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, नादुरुस्त बसेसची दुरुस्ती करूनच आगाराबाहेर काढण्यात यावी, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मातेश्वरी कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी अनेक वेळा आंदोलन केले. मात्र आश्वासनावर बोळवण करण्यात आली. त्यामुळे आता आरपारची लढाई सुरू केली असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा डागा ग्रुपच्या चालकांनी दिला आहे.
दरम्यान, विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी डागा ग्रुपच्या चालकांनी घाटकोपर व मुलुंड बस आगाराबाहेर काम बंद आंदोलन सुरू केले. आझाद मैदानातही उपोषण सुरू असून बुधवारी मंत्रालयात तोडगा न निघाल्याने गुरुवारी डागा ग्रुपच्या सहा डेपोतील ५७५ बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर उतरणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सलग दोन दिवस प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
या बस डेपोवर परिणाम
घाटकोपर, मुलुंड, देवनार, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, आणिक व गोराई या बस डेपोवर परिणाम होणार आहे. दरम्यान, आझाद मैदानात सुरू असलेल्या बेस्टच्या कंत्राटी चालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड येथील बेस्ट कंत्राटी कामगारांनी बुधवारी संप केला. बेस्ट कंत्राटी कामगार चालक आणि वाहक यांनी केलेल्या संपामुळे बुधवारी मुंबईतील बेस्ट वाहतुकीवर परिणाम झाला.