पालिकेचे विद्यार्थी गणित, विज्ञानात होणार हुश्शार

धडे आता अनिमेशन गेमिफाईड अँपवर; १० वी च्या १८ हजार विद्यार्थ्यांना फायदा
पालिकेचे विद्यार्थी गणित, विज्ञानात होणार हुश्शार

मुंबई : निकालात घसरलेला टक्का वाढीसाठी पालिका शाळांतील १० वीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाचे विशेष धडे दिले जाणार आहे. अनिमेशन गेमिफाईड ई कंटेट या अँपद्वारे १० वी च्या १८ हजार विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाचे धडे देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅब मध्ये गेमिफाईड ई कंटेट अँप डाऊनलोड करण्यात येणार आहे. यासाठी १८ हजार अँप खरेदी करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. या अँपमध्ये आर्टिफिशीयल इंटिलिजन्स वापर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई महापालिकेच्या १,१५० शाळांमध्ये साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. स्वतंत्र संगीत, कला, कार्यानुभव, स्काऊट- गाईड विभाग असणारी ही देशातील एकमेव महापालिका आहे. पालिका शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. शिवाय व्हर्च्युअल क्लासरूम, मोफत ‘बेस्ट’ प्रवास, टॅब अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागल्याने पालिका शाळेतील विद्यार्थी टिकवणे आणि वाढवणे असे दुहेरी आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले आहे.

शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी उपक्रम

पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी केंब्रीज बोर्ड, ‘आयसीएसई’, ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, विज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास अशा प्रकारे सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १० वी च्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानात अधिक ज्ञान मिळावे, यासाठी गेमिफाईड ई कंटेट अँपचा वापर करण्यात येणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब

दप्तराचे ओझ कमी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देण्यात आले आहेत. या टॅब मध्ये गेमिफाईड ई कंटेट अँप डाऊनलोड करण्यात येणार आहे. या अँप मध्ये गणित, विज्ञानाचे गेम असणार आहेत. या गेमिफाईड अँपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाचे धडे देण्यात येणार आहेत. १० वी चे १८ हजार विद्यार्थी असून प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पालिका शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्याला गेमिफाईड ई कंटेट अँपच्या माध्यमातून गणित व विज्ञानाचे धडे देण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

पालिकेची शैक्षणिक स्थिती

- नर्सरी ते १० वी पर्यंतच्या एकूण शाळा - ११५०

- शाळांच्या एकूण इमारती - ४५०

- सध्याची विद्यार्थीसंख्या - ४ लाख ५० हजार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in