आठवडाभरापासून सुर्य दर्शन नाहीच ; मुंबईत पावसाची धुवांधार

जोरदार पावसाच्या तडाख्याने चर्चगेट, अंधेरी सब वे, सायन आदी सखल भाग जलमय झाल्याने रस्ते वाहतूक कोलमडली
आठवडाभरापासून सुर्य दर्शन नाहीच ; मुंबईत पावसाची धुवांधार

मुंबई : आठवडाभरापासून बरसणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री काहीशी उसंती घेतली. परंतु गुरुवार सकाळपासून पुन्हा एकदा मुंबई व परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. जोरदार पावसाचा तडाख्याने चर्चगेट, अंधेरी सब वे, सायन आदी सखल भाग जलमय झाल्याने रस्ते वाहतूक कोलमडली. तर मध्य व हार्बर मार्गावरील रेल्वे लोकल सेवा धीम्या गतीने सुरु होती.

तर चर्चगेट, मरीन लाइन्स स्थानकातील रुळांवर पाणी जमा झाले. पश्चिम रेल्वे प्रशासनाने पंपाच्या साहाय्याने उपसा केला. तरीही लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु होती. दरम्यान, मुंबईत शुक्रवार सकाळपर्यंत रेड अलर्ट तर ठाण्यात उद्या शुक्रवार व शनिवारी ऑरेंज अलर्ट' जारी केल्याचे कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी रात्री ८.३० ते गुरुवार सकाळी ८.३० पर्यंत कुलाब्यात रेकॉर्ड ब्रेक २२३.२ मिमी, सांताक्रुझ येथे १४५.१, भायखळा येथे ११९.० ही सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मुंबईत आठवड्याभरापासून पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी रात्री काहीशी उसंती घेतलेल्या पावसाचा जोर गुरुवारी वाढला. सतत बरसणाऱ्या पावसामुळे २६ जुलै २००५ ची आठवण ताजी झाली. गुरुवार सकाळपासून मुंबई शहर पूर्व व पश्चिम उपनगराला पावसाने झोडपले. पावसाच्या तडाख्याने मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. चेंबूर शेल कॉलनी, दादर टीटी, परळ, मंत्रालय परिसर, गोवंडी, मानखुर्द, धारावी, माहिम, भांडुप, मालाड, गोरेगाव, कांदिवली, वांद्रे कुर्ला हे भाग जलमय झाले. सखल भाग जलमय त्यात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, मुंबई रेड अलर्ट जारी केले आहे.

हे भागात एक ते दोन फूट पाणी जमा

आझाद मैदान, कुर्ला, मानखुर्द, चेंबूर शेल कॉलनी, सायन गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, माटुंगा हायवे, भांडुप, भायखळा डॉकयार्ड, ट्रॉम्बे फ्री वे म्हैसूर कॉलनी, पोयसर सबवे, काळबादेवी एम. के. रोड, विरा देसाई रोड ओशिवरा, घनशॉम टॉवर, पश्चिम द्रूतगती मार्ग, मागाठाणे दहिसर, अंधेरी सबवे, घाटकोपर, वांद्रे, अंधेरी डीएन नगर, मालाड साईनाथ सब वे, कुलाबा, मरीन लाईन्स, चर्चगेट

१५ ठिकाणी झाडे पडली -

मुसळधार पावसामुळे शहरात ४, पूर्व उपनगरांत ४ व पश्चिम उपनगरांत ७ अशा १५ ठिकाणी झाडे फांद्या कोसळल्याची घटना घडली. तर ७ ठिकाणी घराचा भाग कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनांत कोणीही जखमी झालेले नाही.

१३ ठिकाणी शाॅर्ट सर्किट

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसात शहरात ५, पश्चिम उपनगरात - १ व पूर्व उपनगरात ७ अशा १३ ठिकाणी शाॅर्ट सर्किटच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

बुधवार रात्री ८.३० ते गुरुवार सकाळी ८.३० पर्यंत पावसाची नोंद

कुलाबा - २२३

सीएसएमटी - १५३.५

सांताक्रुझ - १४५.१

राम मंदिर - १६१.०

भायखळा - ११९.०

सायन - ११२.०

वांद्रे - १०६.०

चेंबूर - ८६.५

माटुंगा - ७८.५

दहिसर - ७०.५

सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत पावसाची नोंद (मिमी)

दहिसर - १५९.५

सांताक्रुझ - ७५.८

कुलाबा - ८५.८

राम मंदिर - ८२.०

भायखळा - ८४.०

सीएसएमटी - ८३.५

चेंबूर - ६०.५

माटुंगा - ६९.०

वांद्रे - ६८.५

ऑरेंज अलर्ट!

कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

रेड अलर्ट!

नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येते. या अलर्ट म्हणजे लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यताही असते.

कोस्टल रोड प्रकल्पामुळे चर्चगेट मरीन लाइन्सवर पाणी साचले नाही - पालिकेचे स्पष्टीकरण

दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असतानाच जोरदार लाटांसोबत वाहून आलेले नैसर्गिक लहान आकाराचे खडक पाटणजैन मार्गाच्या पर्जन्य जल पातमुखात (आऊटफॉल) अडकले होते. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि पर्जन्य जल वाहिन्या विभाग यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून हे पातमुख मोकळे केले. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या राडारोड्यामुळे चर्चगेट मरीन लाइन्स स्थानकातील रुळांवर पाणी साचले नाही, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिका प्रशासनाने दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in