शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव ५ सप्टेंबरपासून होणार खुला

१९८८ मध्ये महापालिकेने शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल उभारले आहे
शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव ५ सप्टेंबरपासून होणार खुला

मुंबई : अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येत्या ५ सप्टेंबर पासून सभासदांसाठी सुरू करण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलात २ जलतरण तलाव असून, पैकी सूर मारण्याच्या तलावाची सुविधा २६ जुलैपासून तर शर्यतीचा तलावाची सुविधा ८ ऑगस्टपासून तेथील पाणी शुद्धीकरण यंत्रणा, संतुलन टाकी आणि अन्य काही अभियांत्रिकी दुरुस्ती कामांसाठी बंद करण्यात आली होती. या दोन्ही तलावांची वरील अभियांत्रिकीय कामे आणि संबंधित चाचण्या आता अंतिम टप्प्यात असून, येत्या ५ सप्टेंबरपासून हे दोन्ही जलतरण तलाव सभासदांच्या सेवेत रुजू होत आहेत, असे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानचे विशेष कार्य अधिकारी सुनील गोडसे यांनी सांगितले.

अंधेरी (पश्चिम) येथे सन १९८८ मध्ये महापालिकेने शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल उभारले आहे. या संकुलाचे व्यवस्थापन व परिरक्षण 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान' या बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक न्यासाकडे सोपविण्यात आले आहे. या संकुलात क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जलतरण तलाव, खुले मैदान असे एकूण ३ महत्त्वाचे विभाग आहेत. त्याचबरोबर या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्यायामशाळा, कार्डिओ व्यायामशाळा, महिलांकरिता विनामूल्य कराटे प्रशिक्षण वर्ग, जिम्नॅस्टिक, स्केटींग, एरोबिक्स, योग, टेनिस, नृत्य, चित्रकला इत्यादी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव

याच क्रीडा संकुलात असणारा जलतरण तलाव हा ऑलिम्पिक दर्जाचा असून, येथील प्रशिक्षकांनी आजपर्यंत हजारो नागरिकांना पोहण्याची कला अवगत करून दिली आहे. तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू देखील या ठिकाणी केलेल्या शास्त्रशुद्ध सरावातून तयार झाले आहेत. जलतरण तलावात प्रगत प्रशिक्षण वर्ग, उन्हाळी शिबिर इत्यादीचे आयोजन करण्यात येते. आता हा तलाव येत्या ५ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सभासदांच्या सेवेत रुजू होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in