मंडप परवानगीसाठीच्या अटी-शर्ती मागे; पाच वर्षे कालावधीबाबत मंडळांना दिलासा

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी पाच वर्षे कालावधीची परवानगी एकदाच देण्याच्या प्रक्रियेतील अटी - शर्ती शुक्रवारी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बहुसंख्य मंडळांना दिलासा मिळाला आहे.
मंडप परवानगीसाठीच्या अटी-शर्ती मागे; पाच वर्षे कालावधीबाबत मंडळांना दिलासा
Published on

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी पाच वर्षे कालावधीची परवानगी एकदाच देण्याच्या प्रक्रियेतील अटी - शर्ती शुक्रवारी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बहुसंख्य मंडळांना दिलासा मिळाला आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत समितीने बाजू मांडली होती. त्यावेळी शिंदे यांनी जाचक अटी शर्ती मागे घेऊन सुधारित परिपत्रक काढण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता. त्यानुसार शुक्रवारी मुंबई महापालिकेने सुधारित परिपत्रक जारी केले. गणेश मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी देताना त्यांच्याकडून स्वयंघोषणापत्र मागण्यात येऊ नये. कोणत्याही अटी शर्तीविना ही परवानगी देण्यात यावी. (गेल्या दहा वर्षांत कोणत्याही नियमाचा किंवा कायद्याचा भंग केलेला नाही, याबाबत हे स्वयंघोषणापत्र होते. त्यामुळे बहुसंख्य मंडळांपुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या.) आता अशा घोषणापत्रासाठी मंडळांना झालेला खर्च परत मिळावी, यासाठी समिती प्रयत्न करणार आहे, असे समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in