राजा माने/मुंबई : शिवसेनेच्या घटनेत २०१८ मध्ये जो बदल झाला, त्याची नोंद निवडणूक आयोगात नाही, असा युक्तिवाद करीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या १९९९ च्या घटनेचा आधार घेऊन बुधवारी निकाल दिला. त्यामुळे २०१८ मधील पक्षाच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे का नाही, यावरून ठाकरे गटात जोरदार खडाजंगी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे, तर काही नेत्यांनी याबाबत थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवत सवाल उपस्थित केल्याचेही समजते. या पार्श्वभूमीवर काही ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. यावर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे समजते.
गेल्या दीड वर्षापासून शिवसेनेतील सत्तासंघर्ष सुरू आहे. यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर बुधवार, दि. १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात निकाल सुनावला. नार्वेकर यांनी शिवसेना आणि पक्षचिन्ह शिंदे गटाचेच असल्याचे सांगत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचाच व्हीप वैध ठरविला. एवढेच नव्हे, तर शिवसेनेच्या २०१८ च्या घटनेची निवडणूक आयोगात नोंद नसल्याचे कारण पुढे करून ती घटनाच अमान्य करून १९९९ च्या घटनेचा आधार घेत हा निकाल दिला. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला.
या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असतानाच शिवसेनेच्या २०१८ च्या घटनेची निवडणूक आयोगात नोंद का नाही, असा सवाल उपस्थित करीत आता थेट ठाकरे गटातच धुसफूस सुरू झाली आहे. घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार, यामध्ये त्रुटी आढळल्याने विरोधात निकाल दिला असल्याचे ठाकरे गटातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी तातडीने खासदार संजय राऊत, खा. अरविंद सावंत आणि सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र, यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे.
एंडोर्समेंट कॉपी घेऊन पत्रकार परिषद घ्यावी
शिवसेनेतील २०१८ च्या घटनेची प्रत अंतर्गत बदलासह निवडणूक आयोगाकडे सोपविली असेल, तर त्याची एंडोर्समेंट कॉपी घेऊन तातडीने पत्रकार परिषद घेत त्यासंबंधीचा खुलासा करावा आणि पक्षाकडे एंडोर्समेंट कॉपी नसेल, तर संबंधितांना जाब विचारावा, अशी मागणीही करण्यात आल्याचे समजते.
आता दोन गटांत कायदेशीर लढाई
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकालही ठाकरे गटाच्या विरोधात गेल्याने आता ठाकरे गट थेट सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. त्यामुळे यापुढेही दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, या निकालानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला असून, ठाकरे गटाची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला भाजप आणि अजित पवार गटाचीही साथ मिळत आहे. त्यामुळे चौफेर टीकेची झोड उठत आहे.