मुंबई : डिलीव्हरीसाठी दिलेल्या सुमारे २८ लाखांच्या नामांकित कंपनीच्या घड्याळाचा अपहार करुन पळून गेलेल्या एका कर्मचाऱ्याला अवघ्या ४८ तासांत बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सुरेशभाई राठोड असे या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी २७ लाखांचे घड्याळ हस्तगत केले आहेत. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. वरुण हर्षद खिमानी हे व्यवसायिक असून, त्यांचा बोरिवली परिसरात नामांकित कंपनीचे घड्याळ विक्रीचे एक दुकान असून, येथील सुरेशभाई याच्याजवळ घड्याळाची डिलीव्हरीचे काम होते. शुक्रवारी १८ ऑगस्टला त्याला वरुण यांनी २८ लाख ३१ हजार रुपयांचे ओमेगा कंपनीचे ब्रेडेड घड्याळ डिलीव्हरीसाठी दिले होते; मात्र डिलीव्हरीसाठी गेलेला सुरेशभाई हा पुन्हा दुकानात आला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याला फोन केला; मात्र त्याच फोन बंद येत होता. सुरेशभाईने डिलीव्हरीसाठी दिलेल्या घड्याळाचा परस्पर अपहार केल्याचे लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांची भेट घेऊन तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवून आरोपी कर्मचाऱ्याचा शोध सुरू केला होता.