
मुंबई : महालक्ष्मीचे गतकालीन वैभव असलेला रेसकोर्स मुलुंड येथे बंद पडलेल्या डंपींग ग्राउंडमध्ये स्थलांतरित करण्यात येणार नाही तर महानगर पालिकेचे विचाराधीन थीमपार्क आणि रेसकोर्स महालक्ष्मी येथेच एकाच ठिकाणी असतील अशी माहिती मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डर्बी रेस आणि तबेले हे रेसकोर्सचे अभिन्न अंग असून ते येथेच राहातील यासाठी सुधारीत योजना तयार करण्यात येत आहे. रेसींग झोनच्या बाहेरील क्षेत्राचा विकास करणे शक्य आहे.
सध्या कोस्टल रोडचे काम सुरु आहे. त्यातून निर्माण होणारी मोकळी जागा आणि रेसकोर्स जर जोडून एकत्र करता आले तर ३५० एकरचे थीमपार्क उभारणे शक्य होर्इल. मात्र सरकारने अजून तरी याबाबत रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब च्या प्रतिनिधींसोबत याबाबत चर्चा केलेली नाही. उबाठा सेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या रेसकोर्सवर थीमपार्क करण्याच्या प्रस्तावावर जोरदार टिका केली होती. हे सरकार बिल्डरसाठी काम करते असा आरोपही त्यांनी केला होता. महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेपट्टा करार संपल्यानंतर पालिकेने तेथे अम्युझमेंट पार्क उभारण्याची योजना आखली होती. १९१४ साली रेसकोर्सची ८.५५ चौरस मीटर जमीन आरडब्लूमआयटीसी ला ९९ वर्षांच्या भाडे करारावर देण्यात आली होती. यापैकी एक तृतियांश जमीनीची मालकी मुंबर्इ महानगरपालिकेकडे आहे तर उर्वरित जमीनीची मालकी महाराष्ट्र राज्य शासनाकडे आहे.