जून महिन्यात समुद्राला मोठी भरती येणार,हवामान विभागाचा इशारा

गेट वे ते एलिफंटा, जेएनपीए, मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस या सर्वच मार्गावरील सागरी वाहतूक बंद
जून महिन्यात समुद्राला मोठी भरती येणार,हवामान विभागाचा इशारा
Published on

पावसाची लपाछपी सुरु असतानाच जून महिन्यात समुद्राला सहा दिवस मोठी भरती येणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे विविध बंदरांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला असून तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सागरी प्रवासी व पर्यटक वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे. गेट वे ते एलिफंटा, जेएनपीए, मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस या सर्वच मार्गावरील सागरी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात २२ वेळा मोठी भरती येणार आहे. त्यापैकी जून महिन्यात समुद्राला एकूण ६ दिवस मोठी भरती असून चालू आठवड्यात या भरती येणार आहेत. गुरुवार, १६ जून रोजी सर्वात मोठी भरती येणार असून त्यावेळी लाटांची उंची ४.८७ मीटर असणार आहे. परिणामी धोक्याच्या तीन नंबरच्या बावटा प्रशासनाकडून लावण्यात आला आहे.

दरम्यान, गेटवे ऑफ इंडिया येथून पावसाळी हंगामात दररोज एक ते दीड हजार पर्यटक एलिफंटा लेण्या पाहण्यासाठी जातात. समुद्र सफरीचा आनंद लुटण्यासाठी २५०० ते ३००० पर्यटक येतात. मात्र सर्वच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आल्याने गेटवे ऑफ इंडिया येथून दररोज होणारी पर्यटक व प्रवासी वाहतूक रविवारपासूनच बंद करण्यात आली आहे. याशिवाय भाऊचा धक्का ते मोरा या सागरी मार्गावरूनही शनिवारी संध्याकाळपासूनच प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in