
मुंबई : काळ आला आणि वेळ आली, याचाच प्रत्यय मुंबईच्या मरीन ड्राईव्ह समुद्रात आला. ५ फुटांचे अगडबंब कासव समुद्रात अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने अग्निशमन दल व वन खात्याला पाचारण केले. त्यांनी त्याला समुद्रातून सोडवले, मात्र त्याचा मृत्यू झाला. या कासवाचे वय १३० वर्षे असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
मरीन ड्राईव्हवरील फ्रामरोज कोर्ट बिल्डिंगसमोरील समुद्रात दगडात मोठे कासव अडल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांना मिळाली. अग्निशमन दलाचे जवान सायंकाळी ५.१५ वाजता घटनास्थळी पोहचले. त्यांना दगडात अडकलेले कासव दिसले. त्यांनी त्याला बाहेर काढले. हे मोठे कासव पाहायला मरीन ड्राईव्ह येथे मोठी गर्दी जमली होती. या गर्दीच्या ठिकाणीत प्राणिप्रेमी संदीप शहा होते. त्यांनी कासवाला व्हॅनमध्ये नेले. नंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठले. तेथे वन अधिकाऱ्यांनी कासवाला तपासले. तेव्हा तो मृत्यू पावल्याचे लक्षात आले. या कासवाचे वय १३० वर्षे होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागूल यांनी सांगितले की, हे कासव पुढील कार्यवाहीसाठी वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.