
मुंबई : पत्ता विचारण्याचा बहाणा करून एका तरुणाकडील सोन्याची चैन आणि आयफोन चोरी करुन पळून जाणाऱ्या त्रिकुटाला टिळकनगर पोलिसांनी अटक केली. आमान मुख्तार शेख, समीर रईस खान आणि साहिब आयुब दळवी अशी या तिघांची नावे आहेत. त्यांचा अन्य एक सहकारी पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
चेंबूर येथे आनंद रामकृष्णन योगेश्वर हा राहत असून त्याचा फुल विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता तो घरातून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कामानिमित्त गेला होता. पार्सल कार्यालयाच्या दिशेने जात असताना त्याच्याकडे एक तरुण आला आणि त्याने त्याला पत्ता विचारण्याचा बहाणा करून बोलण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान तिथे अन्य तीन तरुण आले आणि त्यांनी त्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि आयफोन चोरीचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आरडाओरड केल्याने तिथे असलेल्या लोकांनी पळून जाणाऱ्या चारपैकी तिघांना पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर या तिघांनाही गस्तीवर असलेल्या टिळकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. चौकशीदरम्यान त्याचे नाव आमान शेख, समीर खान आणि साहिब दळवी असल्याचे उघडकीस आले. ते तिघेही मुंब्रा परिसरात राहत असून चोरीच्या उद्देशाने कुर्ला परिसरात आले होते. रॉबरीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या तिघांनाही सोमवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.