
मुंबई : शिवसेनेच्या विभागप्रमुखावर हल्ला करून पळून गेलेल्या एका त्रिकुटाला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. मंगेश एकनाथ गुरव, सिद्धार्थ आशितभाई जेठवा आणि मनोज दादाराव गुडवे अशी या तिघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अल्ताफ दाऊद पेवेकर हे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे अंधेरी-वर्सोवा विभागसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी त्यांच्या पक्षातर्फे वर्सोवा विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम सोहळा संपल्यानंतर ते कार्यालयातून रात्री उशिरा कारने घरी जात असताना, एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कारवर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केल्यानंतर हल्लेखोराने त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला होता. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी मंगेश गुरव, सिद्धार्थ जेठवा आणि मनोज गुडवे या तिघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.