मंदिराच्या भिंतीसह कळस कोसळून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

घटना शनिवारी दुपारी २.४५ वाजता गोरेगाव येथील वालभट्ट रोडवरील संत रोहिदास नगरातील संत रोहिदास मंदिरासमोर घडली
मंदिराच्या भिंतीसह कळस कोसळून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

मंदिराच्या भिंतीसह कळस कोसळून झालेल्या दुर्घटनेत भावेश दिलीप पवार या नऊ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. याप्रकरणी मंदिराच्या तीन पदाधिकार्‍यांविरुद्ध वनराई पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. त्यात अध्यक्ष पंडित दशरथ पवार, सचिव अशोक शंकर देहरे आणि खजिनदार रोहिदास भास्कर अहिरे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना शनिवारी दुपारी २.४५ वाजता गोरेगाव येथील वालभट्ट रोडवरील संत रोहिदास नगरातील संत रोहिदास मंदिरासमोर घडली. याच परिसरात चालक म्हणून काम करणारे दिलीप पवार हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांना भावेश नावाचा एक नऊ वर्षांचा मुलगा आहे. काही अंतरावरील संजयनगर भूमी इमारतीमध्ये त्यांचा मोठा भाऊ दत्ताराम हा राहतो. २३ जूनला दिलीप पवार हे पुण्याला कामानिमित्त गेले होते. यावेळी त्याला त्याच्या भावाने फोन करून त्याचा मुलगा भावेशच्या अंगावर संत रोहिदास मंदिराची भिंत आणि कळस पडला असून त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्यामुळे दिलीप हे लागलीच पुण्याहून मुंबईला येण्यासाठी निघाले. मुंबईत आल्यानंतर त्यांना भावेशची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. मंदिराच्या भिंतीला तडे गेले होते. त्यामुळे मंदिराची दुरुस्ती करणे गरजेचे होते. याबाबत स्थानिक रहिवाशांनी मंदिरातील पदाधिकार्‍यांना व्हॉट्स अॅपद्वारे सूचित केले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in