वेदांत प्रकल्पामुळे एकमेकांवर खापर फोडणे सुरूच

तळेगावमध्ये सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार होता; मात्र हा प्रकल्प अचानक गुजरातला गेला
वेदांत प्रकल्पामुळे एकमेकांवर खापर फोडणे सुरूच

वेदांत आणि फॉक्सकॉनचा तब्बल १.५४ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातने पळवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेली खळबळ अद्याप कायम असून याप्रकरणी बुधवारीही सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर त्याचे खापर फोडणे सुरूच ठेवले. या प्रकल्पावरून उडालेली वादाची धूळ लवकर खाली बसण्याची चिन्हे दिसत नाहीत.

वेदांत’च्या प्रमुखांचीही झोप उडाली होती!

तळेगावमध्ये सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार होता; मात्र हा प्रकल्प अचानक गुजरातला गेला. या प्रकल्पाची घोषणा होण्यापूर्वी ‘वेदांत’चे चेअरमन अनिल अग्रवाल अस्वस्थ होते. त्यांच्या मनात बरीच धाकधूक होती. अग्रवाल यांच्या जनसंपर्क व्यवस्थापक आस्था त्यागी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. “सेमीकंडक्टर प्रकल्पाची घोषणा करण्यापूर्वी माझे बॉस अनिल अग्रवाल सर यांच्या मनात अस्वस्थता आणि धाकधूक होती. त्यामुळे त्यांना विमानात फारशी झोपच लागली नाही,” असे आस्था त्यागी यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी - अजित पवार

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची विनंती केल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. आम्ही सगळी परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी वेळ पडल्यास दिल्लीत जा. इथे राजकीय इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे आहे. तुम्ही काहीही करा, यासंदर्भात वेदांत समूहाशी बोलून त्यांना महाराष्ट्रात परत येण्यासाठी आग्रह धरा, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

“सरकार बदलताच हा एवढा मोठा प्रकल्प प्रकल्प गुजरातेत गेला. महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहीहंड्याच फोडत बसायचे काय?” असा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

“फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आघाडीवर होते; मात्र गुजरातची कुठेच चर्चा नव्हती. हे राज्य स्पर्धेतच नव्हते. हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. आम्ही मागच्या एक-दीड वर्षापासून महाविकास आघाडी सरकारच्यामार्फत जोरदार प्रयत्न केले. त्यावर शिंदे-फडणवीस सरकारने पाणी फिरवले,” अशी प्रतिक्रिया माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. देसाई पुढे म्हणाले की,“दाव्होस परिषदेत अग्रवाल यांच्यासोबत चांगली सकारात्मक चर्चा झाली. केंद्र सरकारचा होकार आम्हाला घ्यावा लागेल, असे अग्रवाल त्यावेळी म्हणाले होते. त्यावेळीच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.” गुजरातनंतर आम्ही दुसरा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहोत. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून आम्हाला यासंदर्भात चांगले प्रस्ताव आले आहेत, असे वक्तव्य याबाबत झालेल्या वादानंतर वेदांत कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आशा जिवंत असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in