
मुंबई : विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडीत प्रश्न, शंका, समस्या यांचे निरसन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने विद्यार्थी संवाद उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विद्यापीठाने मंगळवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२.३० या दरम्यान विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कुलगुरू विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज भवन (नवीन परीक्षा भवन) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे आणि सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थी संवाद कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र आणि तक्रार अर्ज सोबत आणावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फ करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी विद्यापीठात विद्यार्थी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमातील पुढील विद्यार्थी संवाद २७ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० ते ५ या दरम्यान आयोजित केला जाणार आहे.
गतवर्षापासून उपक्रमाला सुरुवात
विद्यार्थ्यांचे निकाल, राखीव निकाल, पुनर्मूल्यांकन, छायांकीत प्रत, गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र अशा अनुषंगिक तक्रारींचे निवारण जलदगतीने आणि तात्काळ करण्यासाठी विद्यापीठाने मागील वर्षापासून विद्यार्थी या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.