हार्बर मार्गावर भिंत कोसळली, मेगाब्लॉकमुळे झाले प्रवाशांचे हाल

लोकल सेवा पूर्ववत झाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
हार्बर मार्गावर भिंत कोसळली, मेगाब्लॉकमुळे झाले प्रवाशांचे हाल

मुंबईत पडझडीच्या घटनांचे सत्र सुरु असतानाच गुरुवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकातील रुळांवर खासगी इमारतीची भिंत कोसळली. या दुर्घटनेमुळे सीएसएमटी ते वडाळादरम्यान लोकल सेवा तब्बल ८ तास ठप्प झाली होती. हार्बर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाने ९ अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्याचे बेस्टच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, भिंतीचा उर्वरित भाग पुन्हा कोसळण्याचा धोका लक्षात घेता मध्य रेल्वेने २ ते ४ या वेळेत विशेष मेगाब्लॉक घेतला होता. सायंकाळी ४ वाजेपर्यंत भिंत सुरक्षित करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत झाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत पडझडीचे या घटनांचे सत्र सुरु आहे. त्यात गुरुवारी सकाळी नोकरवर्ग कामावर जाण्याच्या घाईत असताना हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकातील रुळांवर खासगी इमारतीची भिंत कोसळली आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली या भिंतीचा भाग पुन्हा कोसळू शकतो, त्यामुळे ही भिंत संरक्षित करण्यासाठी दुपारी २ ते ४ या वेळात दोन तासांचा तातडीचा मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे. प्रवाशांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ९ बसेस सोडल्या.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुळावर पडलेले डेब्रिज तातडीने दूर करून सकाळी ७.३० नंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या भिंतीचा भाग पुन्हा कोसळू शकतो, त्यामुळे ही भिंत संरक्षित करण्यासाठी दुपारी २ ते ४ या वेळात दोन तासांचा तातडीचा मेगाब्लॉक घेऊन काम सुरू करण्यात आले. या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेनलाईनवरून प्रवास करण्याची परवानगी रेल्वेकडून देण्यात आली होती. ब्लॉकदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेऊन ते पूर्ण केल्यानंतर संध्याकाळी हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत झाली. मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने हार्बर मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.

रात्री उशिरा उर्वरित बांधकाम जमीनदोस्त!

मस्जिद बंदर स्थानकातील रुळांवर खासगी इमारतीतील बेस्ट उपक्रमाचे सबस्टेशन आहे. त्या सबस्टेशनची भिंत कोसळली. त्या ठिकाणी उर्वरित भिंत रात्री उशिरा मेगाब्लॉक घेत पाडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या बी वॉर्डचे सहायक आयुक्त धानजी हार्लेकर यांनी सांगितले. दरम्यान, मस्जिद बंदर परिसरात धोकादायक इमारतींना ३५४ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच स्ट्रक्चरल ऑडिट सादर करा, असे निर्देश इमारत मालक व रहिवाशांना दिल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in