समुद्रातील पाणी समुद्रातच रोखणार ; कोस्टल रोड प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण

कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ७६ टक्के काम पूर्ण झाले असून नोव्हेंबर अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन
समुद्रातील पाणी समुद्रातच रोखणार ; कोस्टल रोड प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण

कोस्टल रोड प्रकल्पामुळे समुद्रातील पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रिय दर्शनी पार्क अमरसन्स हजी अली वरळी अशा विविध ठिकाणी पर्जन्य जल वाहिनी विभागाच्या माध्यमातून १६ फ्लड गेट बांधण्यात येणार असून, १४ ठिकाणी फ्लड गेट बांधण्यात आले आहेत. यामुळे भुलाभाई देसाई रोड प्रिय दर्शनी पार्क या भागात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका ओसरला असून, या भागातील नागरिकांना पावसाळ्यात दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ७६ टक्के काम पूर्ण झाले असून नोव्हेंबर अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

कोस्टल रोड प्रकल्प मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे प्रियदर्शनी पार्क, अमरसन्स, हजी अली, वरळी आदी भागात पावसाळ्यात भरतीच्या वेळी समुद्रातील पाणी बाहेर रस्त्यावर येऊ नये यासाठी १६ ठिकाणी फ्लड गेट बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी १४ ठिकाणी फ्लड गेट्सच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले असून, मरीन ड्राईव्ह परिसरात या फ्लड गेटच्या कामासाठी लवकरच सुरूवात होणार आहे. दरम्यान, या फ्लड गेटमुळे समुद्रातील पाणी भरतीच्या वेळी रोखले जाईल, असे कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी सांगितले.

कोस्टल रोड प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण झाले असून, पावसाळ्यात ही हे काम वेगाने सुरू राहणार आहे. पालिकेच्या अभियंत्यांनी दगडाची सी वॉल (सागरी भिंत) जानेवारी २०२० मध्ये बांधायला घेतली. या मार्गाच्या १०.५ किमी पैकी ७.५ किमी लांब मार्गावर सी वॉल बांधल्यानंतर प्रत्यक्षात सांगाडा व त्यानंतर रस्ता बांधण्यात येत असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे सब इंजिनिअर विजय मोरे यांनी दिली.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतचे कोस्टल रोडचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. भविष्यात एखादे वादळ किंवा मोठ्या लाटांमुळे या मार्गाचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.

कोस्टल रोड सागरी जिवांनाही जपतोय!

मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखकर करणारा पर्यावरणपूरक कोस्टल रोड सागरी जिवांनाही जपत असल्याचे समोर आले आहे. याबाबत नॅशनल इन्स्टिट ऑफ ओशिनोग्राफिचा अहवाल पुन्हा एकदा सकारात्मक आला असून, कोस्टल रोडवर समुद्राच्या बाजूने लावलेल्या महाकाय दगडांमध्ये सागरी जीव वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आगामी काळात ‘आर्टिफिशीअल रीफ’ही बसवण्यात येणार दहा ठिकाणी याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग सुरू करण्यात आला आहे.

'असा' आहे कोस्टल रोड

रस्त्याची लांबी - १०.५८ कि.मी.

मार्गिका संख्या - ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)

भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी – ४.३५ कि.मी.

पुलांची एकूण लांबी – २.१९ कि.मी.

बोगदे – दुहेरी बोगद्यांची लांबी - प्रत्येकी २.०७ कि.मी., ११ मीटर अंतर्गत व्यास (प्रत्येकी ३ वाहनमार्गिका)

प्रकल्पाचे इतके काम पूर्ण

बोगदा खणन - १०० टक्के पूर्ण

भराव - ९५ टक्के पूर्ण

समुद्रभिंत - ८४ टक्के पूर्ण

आंतरबदल - ५७ टक्के पूर्ण

पूल - ६० टक्के पूर्ण

logo
marathi.freepressjournal.in