पाणीकपातीचे मुंबईवर संकट; सातही धरणांत २९.५७ टक्के पाणीसाठा

मोडक सागर, मध्य वैतरणा अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या धरणांतून मुंबईला रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा लागतो.
पाणीकपातीचे मुंबईवर संकट; सातही धरणांत २९.५७ टक्के पाणीसाठा
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

उन्हाळा सुरू झालेला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारने २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा दिला आहे, तर मुंबई महापालिकेच्या सात धरणांत २ एप्रिल रोजी ४ लाख २७ हजार ९८१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. राखीव पाणीसाठ्यासह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा हा जेमतेम जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतकाच आहे. जूनमध्ये पाऊस लांबणीवर गेल्यास १० ते १५ टक्के पाणीकपात करावी लागू शकते. दरम्यान, मेमध्ये धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

मोडक सागर, मध्य वैतरणा अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या धरणांतून मुंबईला रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा लागतो. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागाने पाठपुरावा केला. मुंबईची पाण्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारने राखीव जलसाठा दिला आहे. २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागवू शकतो, तर सात धरणांतील पाणीसाठा १० जूनपर्यंत पुरणार आहे. गेल्या वर्षी संपूर्ण जून कोरडा गेला होता. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जूनमध्ये पावसाने पाठ फिरवल्यास मुंबईत पाणीबाणी परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात सातही धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेत पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

सातही धरण क्षेत्रात २ एप्रिल रोजी ४ लाख २७ हजार ९८१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. २०२२-२३ च्या तुलनेत ९ टक्के पाणीसाठा कमी असून २ एप्रिल रोजी २९.५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे.

जुलैपर्यंत तहान भागेल इतका राखीव पाणीसाठा!

अप्पर वैतरणा धरणातून ९३५०० दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा राज्य सरकारने दिला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा व राखीव पाणीसाठा मिळून जुलैपर्यंत मुंबईची तहान भागवली जाऊ शकते. गरजेनुसार राखीव पाणीसाठ्याचा वापर करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

सात धरणांतील साठा (दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा - ९१,६०९

  • मोडक सागर - ३०,७८२

  • तानसा - ६२,७५१

  • मध्य वैतरणा - २५,२४६

  • भातसा - २,०२,३८८

  • विहार - ११,५३२

  • तुळशी - ३,६७४

logo
marathi.freepressjournal.in