पावसाचा लहरीपणा 'जल संकटाची चाहूल' !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली
पावसाचा लहरीपणा 'जल संकटाची चाहूल' !

वातावरणीय बदलामुळे पाऊस लहरी झाला आहे. पावसाचा अचूक अंदाज बांधणे दिवसेंदिवस जिकिरीचे झाले आहे. दरवर्षी जुन महिन्याच्या ७ तारखेपासून बरसणारा पाऊस लहरी झाला आहे. मुंबईत पाऊस तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राकडे पाठ, यामुळे मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. पावसाचा हा लहरीपणा 'जल संकटाची चाहूल' आहे. त्यामुळे 'जल बिना मच्छली' म्हणी प्रमाणे 'पाणी नाही, तर आपले जीवन नाही' याचा विचार करणे गरजेचे आहे.

मुंबईच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सोयीसुविधा तोडक्या पडणे स्वाभाविक आहे. सोयीसुविधा सहज उपलब्ध होत असल्याने आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, हा आपला स्वभाव झाला आहे. मुंबईत पाणी सहज उपलब्ध होत असले, तरी भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पाणी जपून वापरणे ही प्रत्येक मुंबईकराची जबाबदारी आहे. पावसाची धरण क्षेत्राकडे पाठ ही मुंबईकरांसह मुंबई महापालिकेसाठी चिंतेचा विषय आहे. आजच्या घडीला मुंबईची तहान भागवण्यासाठी दररोज ३,९०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असला, वाढत्या लोकसंख्येमुळे रोजची पिण्याच्या पाण्याची गरज वाढणे सहाजिकच आहे. ब्रिटिशांनी त्यावेळच्या लोकसंख्येच्या तुलनेत धरणांची बांधणी केली. परंतु गेल्या काही वर्षांत मुंबईच्या लोकसंख्येत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करणे शक्य झाले नाही. समुद्राचे पाणी गोडे करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया याकडे पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले असले तरी ते लक्ष सहज गाठणे शक्य नाही. त्यातही सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यासाठी उपलब्ध झाले, तरी ते पाणी पिण्याची मुंबईची मानसिकता आहे, का मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भविष्यातील जलसंकट लक्षात घेता प्रत्येकाने पाणी बचतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळत पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी महापालिका प्रशासनाबरोबर मुंबईकरांनी पुढे येणे गरजेचे आहे.‌

यंदाच्या वर्षी ही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे मुंबईवर १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर वरुणराजाने तलाव क्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने पाणी कपातीच्या संकटातून मुंबई सावरली. मात्र वातावरणीय बदल लक्षात घेता पाणी कपातीचा सामना भविष्यात करावा लागणार याचे संकेत ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने मिळत आहेत. सध्या १० सप्टेंबर रोजी सात ही धरणात ९६.७९ टक्के पाणी साठा उपलब्ध असला तरी सप्टेंबर महिन्यात वरुणराजाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवली तर मात्र मुंबईत पाणीबाणी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याने मुलभूत सुविधा उपलब्ध होतात. परंतु पाऊस पाडणे तुम्हा आम्हा कोणाच्या हातात नाही. त्यामुळे 'पाण्याची आजची बचत उद्याची गरज' हेही तितकेच खरे आहे.

भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता दमणगंगा, गारगाई व पिंजाळ हे पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गारगाई २०२७, पिंजाळ २०२५ तर दमणगंगा २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. प्रत्यक्षात कधीपर्यंत पूर्ण होईल याची खात्री पालिका प्रशासन देऊ शकत नाही. परंतु पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरू आहेत यात शंका नाही; मात्र आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना मुलभूत गरजांकडे आपणच दुर्लक्ष करत आहोत. पाणी हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार अशी ओरड होते. परंतु 'पाणी वाचवा' 'पाणी साठवा' अशी ओरड कोणीही करताना दिसत नाही. मला मिळालं म्हणजे विषय संपला असा गैरसमज समाजात आता वाढू लागला आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा, पाणीच येत नाही, गढुळ पाणीपुरवठा अशा विविध कारणांमुळे मुंबईत पाण्याची ओरड सुरूच असते. भविष्यात वातावरणीय बदलामुळे वेळेत पावसाचे आगमन होईल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे पाणी नाही, तर जीवन नाही, ही भीती मनाशी बाळगत पुढील उपाययोजना करण्यासाठी आपण ही पाऊल उचलले तर अन् तरचं आपले अस्तित्व या भूमीवर टिकेल, हेही तितकेच खरे.

पाण्याची गरज वाढणार

वातावरणीय बदलामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडते किंवा अपेक्षाच्या तुलनेत कमी बरसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, भारतासारख्या प्रगतशील देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दरवर्षी पाणी बाणीची स्थिती उद्भवते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी नियोजन पद्धतीने स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा होतो; मात्र भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार याचे संकेत गेल्या काही वर्षांपासून मिळत असताना ही मुंबईकर पाणी वाया घालवण्यात धन्यता मानतात. मुंबईला सद्यस्थितीत दररोज ३,९०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. भविष्यात वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता पाण्याची गरज वाढणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, पाणी आडवा, पाणी जिरवा, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in