महिलेने सरकारी वकिल असल्याची बतावणी करून अनेकांना घातला कोट्यवधींचा गंडा

मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकिल असल्याची बतावणी करून तिने आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
महिलेने सरकारी वकिल असल्याची बतावणी करून अनेकांना घातला कोट्यवधींचा गंडा
Published on

मुंबई : एक कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी श्वेता अनिल बडगुजर ऊर्फ कविता दिपक देसाई ऊर्फ स्मिता दिपक देसाई या महिलेविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकिल असल्याची बतावणी करून तिने आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. कस्टमने जप्त केलेले गोल्ड काईन, घड्याळ तसेच दादरमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याच्या नावाने तिने ही फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रभादेवी येथे राहणारी ७१ वर्षांची तक्रारदार महिला बिंबा मनोज नायक ही व्यावसायिक असून, तीन वर्षांपूर्वी तिची श्‍वेताशी ओळख झाली होती. तिने तिला ती सरकारी वकिल, तर तिचा भाऊ पियुष प्रधान हा कस्टममध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. तिला कस्टमने जप्त केलेले गोल्ड कॉईन आणि घड्याळ देण्याचे आमिष दाखवून तिच्यासह तिच्या नातेवाईकांकडून सुमारे ९१ लाख आणि मुलीला दादर येथे स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून सुमारे ६८ लाख रुपये असे १ कोटी ६२ लाख रुपये घेतले होते; मात्र त्यांना गोल्ड कॉईन आणि फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच बिंबा नायक यांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी श्‍वेता बडगुजरविरुद्ध फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंदविला आहे. आतापर्यंत पोलीस तपासात श्‍वेता ही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तिच्याविरुद्ध वांद्रे, मुलुंड, वाकोला, कांदिवली, ओशिवरा, डी. एन नगर, ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल आहेत.

logo
marathi.freepressjournal.in