अनाथ शब्द आक्षेपार्ह नाही! हायकोर्टाने आक्षेप घेणारी याचिका फेटाळली

जन्मतः पालक नसलेल्या अथवा पालक गमावलेल्या मुलांना अनाथ म्हणून संबोधित केले जाते.
अनाथ शब्द आक्षेपार्ह नाही! हायकोर्टाने आक्षेप घेणारी याचिका फेटाळली

पालक गमावलेल्या मुलांना अनाथऐवजी स्वनाथ हा शब्दप्रयोग वापरावा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने गुरुवारी फेटाळून लावली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने अनाथ या शब्दांत आक्षेपार्ह असे काही नाही. अशा मुलांना मराठी, हिंदी आणि बंगाली भाषेतही गेली कित्येक वर्षे अनाथ हाच शब्द वापरात आहे, असे स्पष्ट करत याचिकेप्रकरणी हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला.

जन्मतः पालक नसलेल्या अथवा पालक गमावलेल्या मुलांना अनाथ म्हणून संबोधित केले जाते. या मुलांना समाजात असुरक्षितेचा सामना करावा लागतो आणि अस्तित्त्वात असलेला अनाथ शब्द गरजू व असुरक्षित मुले असे प्रतिबिंबित करत असल्याने अनाथ शब्दाला आक्षेप घेत, त्याऐवजी स्वनाथ शब्द वापरण्याचे केंद्र सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका स्वनाथ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने हायकोर्टात दाखल केली. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी याचिकाकर्त्यांनी पालक गमावलेल्या मुलांसाठी वापरण्यात येत असलेला अनाथ हा शब्द गरजू अथवा असुरक्षित मुले असा होतो. त्याऐवजी स्वनाथ हा शब्द वापरण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशी विनंती केली. याची दखल खंडपीठने घेतली.

अनाथ या शब्दात आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या मताशी आम्ही सहमत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोदविताना या शब्दात कलंक नाही. ज्या मुलांना पालक नाहीत, त्यांच्यासाठी हा शब्द गेल्या कित्येक वर्षापासून वापरला जात आहे. तो बदणल्याचा याचिकाकर्ते प्रयत्न करत आहेत; परंतु अनाथ शब्द बदलण्याची गरज नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in