
अंधेरीतील एका कंपनीत प्रवेश करून सुमारे एक कोटी रुपयांचे हिरे चोरी करून पळून गेलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. हासीम अजहरअली खान, इर्शाद इब्राहिम कुरेशी आणि रोशन सोहराव चौधरी अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे. १८ मेला कंपनीत घरफोडी झाली होती. दोन अज्ञात व्यक्तीने कंपनीत प्रवेश करून सहापैकी चार लॉकर तोडून सुमारे एक कोटी रुपयांचे हिरे आणि स्टोन चोरी करून पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या वतीने बिजिया मिश्रा यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना हासीम खान, इर्शाद कुरेशी आणि रोशन चौधरी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.